वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावर उभारण्यात आलेला काचेचा पूल पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरणार


वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधाबा हा बारमाही वाहणारा धबधबा प्रसिद्ध आहे. या धबधब्यावर उभारण्यात आलेला अभिनव संकल्पनेतील काचेचा पूल पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरणार आहे.नैसर्गिक सौदर्याने बहरलेल्या, नटलेल्या या धबधब्याच्या सौंदर्यात भर टाकणारा असा हा पूल आहे. त्यामुळे धबधब्याकडे पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात प्रवेश करतांना वैभववाडी तालुका जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. जिल्ह्यात येणारा पर्यटक हा नापणे धबधाब्याला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाही. दरवर्षी देश विदेशातील हजारो पर्यटक येथे येत असतात.पावसाळ्यात नदीतील पाण्याचा प्रवाह मोठा असतो त्यामुळे धबधबा रौद्ररूप धारण करतो त्यामुळे पर्यटकांना लांबूनच धबधबा पाहण्याचा आनंद घ्यावा लागतो.

हा धबाधबा पर्यटनद़ृष्ट्या विकसित करावा, अशी मागणी करण्यात येत होती. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत धबधब्याची पाहणी करून सार्व. बांधकाम विभागाला धबधब्या पर्यटनद़ृष्ट्या विकसित करण्याच्या द़ृष्टीने आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्हा नियोजन कडून सार्व.बांधकाम विभागाला प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार सा. बां. विभागाने आर्किटेकडून प्लॅन बनवून घेतला. त्यानुसार पूल, खाली उतरण्यासाठी पायर्‍या, पर्यटकांना आवश्यक प्राथमिक सुविधा असा प्रस्ताव करण्यात आला होता.यावर्षी सिंधूरत्न योजनेतून 99 लाख 63 हजार रुपये खर्च करून हा आगळावेगळा अभिनव पद्धतीचा काचेचा पूल उभारण्यात आला आहे. त्याला कमानी पद्धतीचे रंगीत रेलिंग करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत पुलाचे काम पूर्ण करून पर्यटकांना हा पूल खुला करण्यात येणार आहे. तसेच पुलाकडे जाण्यासाठी पायर्‍या बांधण्यात आल्या असून त्याला आकर्षण रेलिंग करण्यात आले आहे. ते हुबेहूब लाकडी असल्यासारखे दिसत आहेत. या पुलावरून मुख्य धबधब्याचे विलोभनीय द़ृश्य पाहता येणार आहे तर मुख्य धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेले धबधबे पाहता येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यातही पर्यटकांना आता धबधबा जवळून अनुभवता येणार आहे. राज्यातील अशा प्रकारचा काचेचा पहिलाच पूल ठरला आहे.

काचेच्या सुरुवातीलाच कृत्रिम फुलपाखरू उभारण्यात आले असून पर्यटकांना हा सेल्फी पॉईंट आकर्षित करीत आहे. तर परिसरातील कातळावर प्राणी, पक्षी यांची चित्र रेखाटण्यात आली आहेत. यामुळे पर्यटनात वाढ होण्यास मदत होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button