
रेल्वेतून लघुशंकेसाठी उतरला अन् दुसऱ्या रेल्वेच्या धडकेत जीव गमावला,तब्बल २२ दिवस मृत्यूशी झुंज.
केरळला निघालेला एक उत्तर प्रदेशातील मजूर संगमेश्वर रेल्वे स्थानकावर रेल्वेतून उतरला आणि लघुशंकेसाठी रुळाजवळ गेला. तेवढ्यात मुंबईच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाला. तब्बल २२ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याचे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात निधन झाले.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव राजू रामविलास यादव (वय ३९, रा. हातिमपूर, जि. देवरिया, उत्तर प्रदेश) असे आहे. तो आणि त्याचा साथीदार इंदलकुमार श्रीप्रसाद (रा. हाटा, जि. कुशीनगर) हे दोघेही रस्त्याच्या गटाराचे काँक्रीटीकरण करण्यासाठी केरळला निघाले होते.
१६ जून २०२५ रोजी गोरखपूर लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने त्यांनी प्रवास सुरू केला आणि १८ जून रोजी मुंबईत उतरल्यानंतर नेत्रावती एक्स्प्रेसने केरळकडे रवाना झाले.या गाडीने संध्याकाळी ६:१५ वाजता संगमेश्वर स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांब घेतली. यावेळी राजू यादव लघुशंकेसाठी खाली उतरला होता. रुळाच्या कडेला उभा असतानाच मुंबईच्या दिशेने भरधाव जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस आली आणि तिने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या हाताला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली.तातडीने खासगी रुग्णवाहिकेद्वारे त्याला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढे अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, २२ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर १० जुलै रोजी दुपारी २ वाजता त्याचा मृत्यू झाला. याची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली आहे.