
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा अत्यंत देखणे, प्रेरक, माहितीपूर्ण आराखडा करा; होलोग्राफीचा वापरही व्हावा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. १३ ):- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हे जगभरातील इतिहासकारांना, अभ्यासकांना आणि संशोधकांना आकर्षित करणारे, प्रेरणा देणारे, ऐतिहासिक माहिती देणारे असावे. त्यासाठी भव्य-दिव्य आणि देखणे स्मारक झाले पाहिजे. तसा आराखडा तयार करताना होलोग्राफीचाही वापर व्हावा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाबाबत काल सादरीकरण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रातांधिकारी जीवन देसाई, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, सुभाष सरदेसाई, राजेंद्र महाडिक, बंड्या साळवी, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना मानांकन दिले आहे. या किल्ल्यांच्या प्रतिकृती संग्रहालयामध्ये असाव्यात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संग्रहालय तयार करा. या परिसरातील मंदिरांचे देखील संवर्धन करावे. अत्यंत कल्पकतेने, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हे स्मारक उभारण्यासाठी त्याचा आराखडादेखील तितकाच प्रभावी तयार करावा. राज्य शासनातर्फे आवश्यक तो निधी दिला जाईल. स्मारकामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, असा सर्वसमावेशक आराखडा तातडीने तयार करावा.