
गोवा बनावटीच्या मद्याचे जिल्ह्यातील अड्डे उद्ध्वस्त करा – पालकमंत्री डॉ.उदय सामंत.
रत्नागिरी, दि. १३ :- जिल्ह्यात विक्रीसाठी येणारे गोवा बनावटीचे मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले पाहिजे. कोणाचाही फोन आला तरी न ऐकता, असे जिल्ह्यातील गोवा बनावट मद्याचे विक्री अड्डे उद्ध्वस्त करा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांसमवेत काल बैठक झाली. बैठकीला अधिक्षक कीर्ती शेडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, गोवा बनावटीच्या मद्याची विक्री जिल्ह्यात जे कोणी करत असेल त्यांनी स्वत:हून हा गैरप्रकार बंद करावा. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे अवैध मद्य जिल्ह्यात येण्यापासून रोखण्यासाठी नाकाबंदी करावी. भरारी पथकाने धाडी घालाव्यात. गोव्याचे मद्य जिल्ह्यात अजिबात येणार नाही, याबाबत पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सतर्क राहून काटेकोरपणे कारवाई करावी.
या बैठकीला जिल्ह्यातील वाईन शॉप, परमिट रुम संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.