
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते मुंबईतील वरळी येथे राहत होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ते अजित पवारांकडे मागील दहा वर्षे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात शोक पसरला आहे. देशमुख यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी साडेआठ वाजता मुंबई दादर येथे अंत्यविधी होणार आहे.
संजय देशमुख यांच्या निधनामुळे अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. “मागील दहा वर्षांहून अधिक काळ माझे जनसंपर्क अधिकारी म्हणून उत्कृष्टपणे काम पाहणारे श्री. संजय देशमुख यांच्या आकस्मिक निधनानं अतीव दुःख झालं,” असे अजित पवार म्हणाले. “त्यांच्या जाण्यानं समर्पक आणि सखोल लिखाण करणारा एक विश्वासू, अनुभवी सहकारी मी गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि माझे कुटुंबिय सहभागी आहोत,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, संजय देशमुख मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जावई होते. त्यांचे पार्थिव सध्या दादरच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. उद्या सकाळी साडेआठ वाजता दादर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.