
आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण तक्ता; उद्यापासून नवीन नियम लागू.
*मुंबई :* प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता मेल व एक्सप्रेस गाड्यांचा आरक्षण तक्ता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधीच उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. पश्चिम रेल्वेकडून हा निर्णय लागू करण्यात आला असून, १४ जुलै २०२५ पासून याची अंमलबजावणी होणार आहे.यापूर्वी ट्रेनच्या नियोजित प्रस्थानाच्या ४ तास आधी आरक्षण यादी प्रसिद्ध केली जात होती. मात्र, आता ती ८ तास आधीच उपलब्ध होणार आहे.
आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांचे नाव, कोच क्रमांक व बर्थ क्रमांक यासह संपूर्ण तपशील यामध्ये नमूद असतो.नवीन वेळापत्रकानुसार आरक्षण तक्ता जाहीर होण्याची वेळ:सकाळी ५:०१ ते दुपारी २:०० या वेळेत निघणाऱ्या गाड्यांसाठी आरक्षण तक्ता आदल्या दिवशी रात्री ९:०० वाजता जाहीर केला जाईल.दुपारी २:०१ ते ४:०० या वेळेतील गाड्यांसाठी तक्ता त्या दिवशी सकाळी ७:३० वाजता प्रसिद्ध केला जाईल.सायंकाळी ४:०१ ते रात्री ११:५९ आणि मध्यरात्री ००:०० ते सकाळी ५:०० या वेळेतील गाड्यांसाठी आरक्षण तक्ता गाडी सुटण्याच्या ८ तास आधी प्रसिद्ध केला जाणार आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुसऱ्या व अंतिम आरक्षण तक्त्याच्या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गाडीच्या नियोजित सुटण्याच्या ३० मिनिटे आधी अंतिम यादी तयार केली जाईल आणि तोपर्यंत प्रवासी रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील.हा निर्णय प्रवाशांचा गोंधळ आणि अंतिम क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून, प्रवास नियोजन अधिक सोयीचे व स्पष्ट होणार आहे, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.