
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५,२८५ घरांसाठी ३ सप्टेंबरला सोडत!
मुंबई :* म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळींजसह अन्य ठिकाणच्या हजारो घरांची विक्री होत नसून या घरांच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरू असताना मंडळाने आता नवीन ५,२८५ घरांची सोडत जाहीर केली आहे. या ५,२८५ घरांच्या सोडतीसाठीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सोमवार, १४ जुलैपासून सुरुवात होणार आहे. तर इच्छुकांना १४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार असून ३ सप्टेंबरला ठाण्यातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार आहे.कोकण मंडळाला २० टक्के सर्वसमावेश योजनेअंतर्गत कोकण मंडळाला ठाणे शहर आणि जिल्हा, वसई येथील ५६५, तर १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेतील ३००२ घरेही मंडळाला उपलब्ध झाली आहेत. या घरांसह कोकण मंडळाच्या म्हाडा गृहनिर्माण योजनेतील १,६७७ घरे आणि विखुरलेल्या ४१ सदनिकांसह एकूण ५ हजार २८५ घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे.
त्यानुसार या घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या घरांसह सिंधुदुर्ग आणि कुळगावर-बदलापूर येथील ७७ भूखंडांचाही सोडतीत समावेश करण्यात आला आहे.या सोडतीसाठीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सोमवारी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते दुपारी १ वाजता सुरुवात होणार आहे. त्यानंतर इच्छुकांना नोंदणी करून अर्ज भरून सादर करता येणार आहे. सोडतपूर्व प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार १४ जुलैपासून अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात होणार असून १३ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजता ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येणार आहे.तर १४ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ पर्यंत संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम भरून अर्ज सादर करता येणार आहे. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६वाजता पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ठाण्यातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार आहे.
म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुकांनी अर्ज भरावा, असे आवाहन कोकण मंडळाकडून करण्यात आले आहे. अर्ज भरताना काही अडचणी आल्यास अर्जदारांनी मदत क्रमांक ०२२ -६९४६८१०० वर संपर्क साधावा.