
मुंबई भोंगेमुक्त! मुख्यमंत्र्यांचा दावा, नवीन भोंगे आढळल्यास स्थानिक पोलीस जबाबदार!
न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात ध्वनिप्रदूषण प्रतिबंधात्मक कायद्याची कठोर अंमलमबजावणी सुरू आहे. मुंबई हे राज्यातील पहिले भोंगेमुक्त शहर ठरले आहे. अशाच प्रकारे राज्यातील अन्य शहरे भोंगेमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
आतापर्यंत ३ ,३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे काढून टाकण्यात आले असून यापुढे ज्या भागात अनधिकृत भोंगे आढळून येतील तेथे स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास जबाबदार धरण्यात येणार असून प्रत्येक पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र भरारी पथक स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. धार्मिक स्थळावरील भोंगे,ध्वनिक्षेपकामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते.
धार्मिक स्थळावरील भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने प्रमाणित कार्यप्रणाली(एसओपी) जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी १६०८ धार्मिक स्थळावरील भोंगे हटविले असून त्यात ११४९ मशिदी, ४८ मंदिर, १० चर्च, ४ गुरुद्वार आणि १४८ इतर धार्मिक स्थळांचा समावेश आहे. आता मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर अनधिकृत भोंगा नाही.
मुंबईबाहेर राज्यभरात १७५९ सर्व धर्मिय धार्मिक स्थळावरील भोंगे हटविण्यात आले असून याचा पूर्तता अहवालावरही न्यायालयाने समाधान व्यक्त केल्याचे फडणवीस यांनी सांगितले प्रमाणित कार्यप्रणाली(एसओपी) लागू झाल्यापासून एप्रिल व मे महिन्यात एकूण ७१ गुन्हे दाखल झाले असून ध्वनिप्रदूषणाविरुद्ध केलेल्या कारवाईवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियु्क्ती करण्यात आली आहे.
तसेच प्रमाणित कार्यप्रणालीत काही बदल करण्यात येणार असून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनाधिकृत भोंगे आढळून येतील तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकास जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच भरारी पथकांच्या माध्यमातूनही अनधिकृत भोग्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
नियमात उत्सव साजरा करणाऱ्यांना त्रास नाही
नवरात्रोत्सव, गणेशोत्सव काळात पोलिसांची परवानगी घेऊन आणि ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादा पाळूनही मंडळांना पोलीस नाहक त्रास देतात, अशी तक्रार आदित्य ठाकरे यांनी केली असता, रितसर परवानगी घेऊन तसेच नियमात उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना कोणताही त्रास होणार नाही. पोलिसांनी नाहक त्रास देऊ नये याबाबत सूचना दिल्या जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
‘सकाळच्या भोंग्याचे काय?’
राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना उल्लेख न करता, राज्यातील भोंग्यावर कारवाई केलीत. पण सकाळच्या १० च्या भोंग्यावर कारवाई कधी करणार अशी विचारणा केली. त्यावर ध्वनिप्रदूषणाविरोधात कायदा असला तरी विचारांच्या प्रदूषणाविरोधात अजून कायदा नाही. तो कायदा झाला की विचार करू, असा टोला फडणवीस यांनी लगावला.