
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी.
रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप नाचणे रोड लिंक रोडवरील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुपाद्यपूजन आयोजन करण्यात आले होते. या सेवेचा लाभ हजारो भक्तांनी घेतला. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दिवसभर भाविकांची अलोट गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत तरुणांसह ज्येष्ठांनी रांगेत उभे राहून शिस्तबद्धपणे स्वामींचे दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला. सकाळी ७ वाजल्यापासूनच भाविकांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दर्शनासाठी गर्दी करायला सुरुवात केली होती.

पावसानेही उसंत दिल्यामुळे भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये यासाठी चोख नियोजन करण्यात आले होते. तसेच सर्व सेवेकऱ्यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे सर्व भाविकांना व्यवस्थित दर्शनाचा लाभ घेता आला, असे श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.




