
तालुकास्तरीय खरीप हंगाम २०२४ भात पीक स्पर्धेत पालीतील पूजा भुवड आणि संजय सोलकर विजयी.
तालुकास्तरीय खरीप हंगाम २०२५ मध्ये सहभागी होण्याचे आवाहनरत्नागिरी : तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत शेतकऱ्यांनी सुधारित कृषी पद्धतींचा अवलंब करून उत्पादन वाढवावे आणि शेतकरी समुदायामध्ये निरोगी स्पर्धा वाढवावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय खरीप हंगाम २०२४ भात पीक स्पर्धेत पालीतील पूजा परेश भुवड यांनी ५७.१९८३ क्विंटल (हेक्टरी) उत्पादन घेऊन प्रथम, तर संजय शांताराम सोलकर यांनी ४७.०८८२ क्विंटल (हेक्टरी) उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांकाने विजयी झाले आहेत. या दोन्ही शेतकरी स्पर्धकांना अनुक्रमे ५ हजार आणि ३ हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत.
या स्पर्धेमध्ये तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता, त्यांनी विविध खरीप पिकांसाठी त्यांची निष्ठा आणि प्रगत शेती तंत्रज्ञान प्रदर्शित केले. कठोर मूल्यमापन प्रक्रियेमध्ये उत्पन्न, उत्पादनाची गुणवत्ता, आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब आणि शाश्वत कृषी पद्धती यासारख्या अनेक निकषांचा विचार करण्यात आला.हे सर्व निकष पार करत चळके (पाली) येथील पूजा परेश भुवड यांनी ५७.१९८३ क्विंटल (हेक्टरी) उत्पादन घेऊन प्रथम, तर खानू (पाली) येथील संजय शांताराम सोलकर यांनी ४७.०८८२ क्विंटल (हेक्टरी) उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन्ही स्पर्धकांना अनुक्रमे ५ हजार आणि ३ हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येक सहभागीचे कौतुक केले आहे.
दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगाम २०२५ मध्ये होणाऱ्या भात आणि नागली पीक स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५ आहे. शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी केले आहे.