
इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आता १७ जुलैला जाहीर होणार
इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आता १७ जुलैला जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, १३ जुलैपर्यंत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्जातील भाग-एक भरता येईल व पूर्वी भरलेल्या माहितीत दुरुस्ती देखील करता येणार आहे.याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेला नाही, त्यांना एक ते दहा महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलता येणार आहे तथा नवा पसंतीक्रम भरता येणार आहे.
राज्यातील २१ लाख विद्यार्थी दहावीची बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. पण, त्यातील केवळ पाच लाख आठ हजार विद्यार्थ्यांनीच आतापर्यंत इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेतला आहे. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर राज्यभरातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नव्याने नोंदणी केली आहे. अकरावीसाठी प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १६ लाखांपर्यंत असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. यंदा प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ माहिती समोर येणार आहे.
सध्या राज्यभरातील विविध शाखांच्या (विज्ञान, कला, वाणिज्य) तीन हजार तुकड्यांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेशासाठी अर्ज केलेला नाही. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक तुकड्यांना कुलूप लावावे लागू शकते, अशी स्थिती आहे.