
मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटन शेतीला पूरक व्यवसायाची जोड मांडकीच्या शेतकऱ्याकडून शेतीला प्रेरणादायी उद्योग व्यवसायाचा दर्जा
*वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ उठवत आणि पूरक व्यवसायाची जोड देत चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील अनंत बाबाजी खांबे या शेतकऱ्यांने अन्य शेतकऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. केवळ वर्षातून येणाऱ्या एका पिकावर समाधानी न राहता मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटन, भाजीपाला, फळबाग यांचा शेतीला नव्या व्यवसायाचा आणि नव्या पिढीलाही सामावून घेत नव्या संकल्पनांची जोड देत खऱ्या अर्थाने शेतीला उद्योग व्यवसाचा दर्जा दिला आहे.

श्री. खांबे हे लोकांमधून सरपंच म्हणून देखील निवडून आले आहेत. वडीलोपार्जित जमीन कसण्याबरोबरच जमिनीत आलेला शेतमाल बाजारात विकण्यापर्यंत हे कुटूंब काम करते. खांबे एकत्र कुटूंबात वीस सदस्य असल्याने शेतीसाठी या मनुष्यबळाचा उत्तम फायदा झाला आहे. भातशेती, फळबाग, भाजीपाला, नाचणी शेतीसाठी शासनाच्या माध्यमातून बी-बियाणे, खते याचा शेतीसाठी पुरवठा होतो. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत काजूची 300 रोपे लावली आहेत. यापूर्वी नारळ लावला असून, त्यासाठी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे. पॉवर व्हिडरसाठी अनुदान घेतले आहे. वडलांच्या काळात 20 गुंठ्यामध्ये पॉलीहाऊस निर्मिती करुन त्यामधून जरबेराचे उत्पादन केले आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत 7 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळाले आहे. रत्नागिरी आठ या जातीच्या भाताची तसेच अन्य व्हरायटी जातीच्या भाताची लागवड केली आहे. शासनाच्या नवनवीन योजनेचा लाभ आम्ही घेत असतो. आमच्या गटालाही मिळवून देत असतो.
भातशेतीनंतर भाजीपालाची शेती करतो. वांगी, कलिंगड, चवळी, पावटा, लाल माठ आदीच्या उत्पादनाचे मार्केटिंग स्वत: करतो. सावर्डा, आरवली, वहाळ, खेर्डी, संगमेश्वर, माखजन या बाजाराच्या ठिकाणी त्याची स्वत: विक्री करतो. दोन हजार भाजीच्या जुडी आम्ही एकट्या सावर्डे बाजारात विकल्या आहेत, असे खांबे यांनी अभिमानाने सांगितले.
शेतकऱ्यांनी बाजार त्यामधील असणारी मागणी असे मार्केटिंगचे तंत्र पाहून शेती केली, तर निश्चितच शेतकरी फायद्यात राहील, असे सांगून श्री खांबे म्हणाले, लवकर येणारे उत्पादने घेवून त्याची विक्री तंत्र हे फायद्याच्या शेतीचे यश आहे. अशावेळी पाच रुपयाची जुडी वीस रुपयांपर्यंत विकली जावू शकते. भेंडी आणि फणसाची झाडे यांची सध्या लागवड करणार आहे. सर्व शेती सेंद्रिय पध्दतीने करण्यावर भर आहे. सेंद्रिय शेतीचा गटही स्थापन केला आहे.
माझी तसेच भावाची मुले उच्चशिक्षित आहेत. त्यांची नवी संकल्पना घेवून सध्या कृषी पर्यटनावर भर देत आहे. शेततळ्यामध्ये मत्स्योत्पादन घेणे, शेततळ्याच्या सहायाने आलेल्या पर्यटकांना मासेमारीचा आनंद देणे, त्यांना राहण्यासाठी झोपडी अशी संकल्पना घेवून, कृषी पर्यटनाची सध्या निर्मिती सुरु आहे. आंबा, काजू, नारळ, भात सारख्या पारंपरिक शेतीबरोबरच या कृषी पर्यटनामधून शेतीबरोबरच रोजगार निर्मितीवर भर राहणार आहे. श्री. खांबे यांनी एक हजार पक्षांचे कुक्कुटपालन देखील केले आहे.
खांबे यांनी शेतीला दिलेली पूरक व्यवसायाची आणि नवनवीन उपक्रमांची जोड ही खरोखरच अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ पावसाळी भात व वर्षातून येणारे आंबा, काजूचे वार्षिक उत्पन्न यावर समाधानी न राहता बाराही महिने शेतीपासून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून खऱ्या अर्थाने शेतीला उद्योगाचा, व्यवसायाचा दर्जा द्यायला हवा.
*- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*