
जे.जे हॉस्पिटल डॉक्टरच्या आत्महत्येचं कारण समोर, प्रेमभंग झाल्याने तणावात होते
मुंबईतील जे.जे.हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले डॉ. ओंकार भगवान कवितके ( वय-32 वर्षे) यांनी सोमवारी रात्री उशिरा मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक म्हणजेच अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.डॉ. कवितके यांच्या आत्महत्येचं कारण आता समोर आलं आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ.कवितके मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यांच्या वर्तणुकीत बदल जाणवल्याने हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय भंडारवार यांनी दिली. मात्र, डॉ. ओंकार यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. तथापि, डॉ. कवितके यांचा प्रेमभंग झाल्यामुळे ते तणावात होते, अशी देखील माहिती समोर आली आहे.डॉ.ओंकार कवितके हे जे.जे.हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांना लवकरच ‘व्याख्याता’ म्हणून पदोन्नती मिळणार होती. त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे पाहत असतानाच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे