शेलू, वांगणी नको मुंबईतच हक्काची घरे द्या! गिरणी कामगारांचा आज लाँग मार्च, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार!

*मुंबई :* शेलू, वांगणी नको गिरणी कामगार आणि वारसांना मुंबईतच हक्काची घरे द्या, या प्रमुख मागणीसाठी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने उद्या, बुधवारी सकाळी 11 वाजता भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान ते विधान भवनापर्यंत लॉँग मार्च काढण्यात येणार आहे. हा लाँग मार्च आझाद मैदान येथे पोहोचल्यावर जाहीर सभा होईल. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी अनेक कामगार संघटना स्वतंत्रपणे लढत होत्या, परंतु गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर लढा परिणामकारक ठरावा यासाठी 14 कामगार संघटनांची गिरणी कामगार संयुक्त लढा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या प्रमुखपदी शिवसेना उपनेते, कामगार नेते सचिन अहिर यांची नियुक्ती केली आहे.

प्रमुख मागण्या

शेलू-वांगणीतील गृहनिर्माण योजना तातडीने रद्द करून गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजे.

शासनाने 15 मार्च 2024 मध्ये अध्यादेश पारित केला आहे. त्यात शेलू-वांगणीतील घरे नाकारल्यास कामगारांचा घराचा हक्क राहणार नाही, असे म्हटले आहे. या अध्यादेशातील कलम 17 रद्द करावा.

* धारावी, बीडीडी चाळ अशा पुनर्वसन योजनेतील अधिकची घरे गिरणी कामगारांना द्या.

* 1981 मध्ये आठ गिरण्यांमधील संपावर गेलेल्या कामगारांनासुद्धा पात्र करून घेण्याबाबत विचार व्हावा.

*14 कामगार संघटना होणार सहभागी

*आंदोलनात राष्ट्रीय मिल मजदूर संघ, सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार सेना, हेमनधागा जनकल्याण फाऊंडेशन, संयुक्त मराठी मुंबई चळवळ, एनटीसी कामगार असोसिएशन, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती, गिरणी कामगार सभा, मुंबई गिरणी कामगार युनियन, सातारा जिल्हा कामगार समिती, गिरणी कामगार रोजगार आणि निवारा आदी संघटना सहभागी होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button