
रत्नागिरीत कर्करोग जनजागृती मोहिम यशस्वी…
रत्नागिरी : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या मार्फत तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष रत्नागिरी व उदय सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कर्करोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक १९ जून रोजी मुख, स्तन, गर्भाशय मुख कॅन्सरसाठी कॅन्सर डायगोन्स्टीक व्हॅनद्वारे तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले होते. याचा शुभारंभ माजी नगरसेविका स्मितल पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख बिपीन बंदरकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विकास कुमरे, वैद्यकीय आधिकारी स्रीरोग तज्ञ डॉ. सचिन साळुंखे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. यश प्रसादे, दंतवैद्य डॉ. शुभदा बडवे, वालावलकर रुग्णालय डेरवणचे डॉ. धनंजय दुमणवार, डॉ. रसिका शिरसाट, डॉ. रसिका आंबेडकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. भास्कर जगताप यांनी या आरोग्य शिबिरात कर्करोगाविषयी जनतेमध्ये विषेशतः महिला वर्गात जनजागरण करणे फार महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन समितीमार्फत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्ह्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख तपासणीसाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध झालेली आहेत. व त्यातील AI तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर रुग्ण तपासणीसाठी होत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली. सदर शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता.तसेच याव्यतिरिक्त रत्नागिरी तालुक्यामध्ये प्राथामिक आरोग्य केंद्र वाटद, कोतवडे, ग्रामीण रुग्णालय पाली, ग्रामपंचायत चिंद्रवली, याठिकाणी कॅन्सर व्हॅन तर्फे तपासणी करण्यात आली.

यामध्ये एकूण ७९७ रुग्णांची तपासणी करून २ मुख कर्करोग, २ स्तन कर्करोग व ३ गर्भाशयमुख कर्करोग असे एकूण ७ संशयित रुग्णाच्या बायोप्सी करण्यात आल्या. तसेच ५३ संशयिंत महिलांचे Pap Smear घेण्यात आले असून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. ही शिबिरे प्राथामिक आरोग्य केंद्र स्तरावर यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे विशेष मार्गदर्शन व त्यांचे अधिनस्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. शिबिराला जिल्हा शासकीय रुग्णालयाचे रामेश्वर म्हेत्रे, सचिन भारणे, प्राजक्ता जाधव, सुचिता पांचाळ, समीक्षा दैत, प्रवीण भोयर, साक्षी समगिसकर यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.