
कर्नाक पूलाचे नाव आता सिंदूर; गुरूवारी १० जुलै रोजी होणार उदघाटन!
मुंबई :* मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक पुलाच्या उद्घाटनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या पुलाचे ‘सिंदूर’ असे नामकरण करण्याचे निश्चित झाले असून गुरुवारी या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होणार आहे. या पुलाचे नाव बदलण्यासाठी त्याचे उदघाटन थांबवण्यात आले होते.
आता नाव निश्चित झाले असून या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन नागरिकांचा त्रास वाचणार आहे.पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील गोखले पूल आणि विक्रोळी येथील पूल सुरू झाल्यानंतर आता मुंबईकरांना शहर भागातील कर्नाक पूल कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. विक्रोळी पूल व कर्नाक पूल हे दोन्ही पूल पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचे उद्दिष्ट्य मुंबई महापालिकेने ठेवले होते. कर्नाक पूल सुरू करण्याचे १० जूनपर्यंत मुंबई महापालिकेचे नियोजन होते. मात्र, जुलै महिना उजाडला तरी हा पूल सुरू केला जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होते. या पुलाची भार चाचणी करायची होती म्हणून पूल सुरू केला जात नव्हता. मग पुलावरची रंगरंगोटी शिल्लक होती म्हणून पूल सुरू होत नव्हता. त्यानंतर रेल्वेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नव्हते म्हणून पूल सुरू करण्यात आला नाही. मात्र भार चाचणी यशस्वी झाली, रंगरंगोटीही झाली, रेल्वेचेही ना हरकत प्रमाणपत्र मिळाले तरी या पुलाचे उद्घाटन का होत नाही याबाबत सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त होत होते. पालिकेच्या पूल विभागानेही पूल सुरू करण्यास हरकत नसल्याचा अहवाल पालिका प्रशासनाकडे दिला होता. परंतु, राज्य सरकारलाच या पुलाचे नाव बदलून रितसर उदघाटन करायचे होते. त्यानुुसार आता या पुलाचे नाव निश्चित झाले आहे. पुलाला सिंदूर हे नाव देण्यात आले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईवरून या पुलाचे नाव सिंदूर ठेवण्यात आले आहे. कर्नाक पुलाचे आधीच नाव हे ब्रिटीश गव्हर्नरच्या नावावरून ठेवलेले होते. त्यामुळे पुलाचे उद्घाटन करताना पुलाचे नाव बदलण्याचा राज्य सरकारचा विचार होता. नाव निश्चित करण्याकरीता या पुलाचे उदघाटन थांबवण्यात आले होते. नाव निश्चित झाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून अखेर नवे नाव निश्चित करण्यात आले आहे.दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) पूल महत्त्वाचा आहे. १५० वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये पुलाचे निष्कासन केले. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे.
दक्षिण मुंबईतील पी. डि’ मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव ह्या वाणिज्यक भागांना जोडणारा हा पूल महत्त्वाचा दुवा आहे.
पुलाच्या पुनर्बांधणीमुळे सुमारे १० वर्षापासून बाधित झालेली पूर्व – पश्चिम वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार.* पूल कार्यान्वित झाल्यावर पी डि’ मेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत.* पुलाच्या पुनर्बांधणीने युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक होणार सुलभ होऊ शकेल.