
अश्लील व्हिडिओ, चॅटिंग अन् तब्बल ३० महिलांचा लैंगिक छळ; नाशिक मध्ये नराधम वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचे धक्कादायक कृत्य
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. इथे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने आपल्याच कार्यालयातील तब्बल ३० सहकारी महिलांचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप आहे.आरोपीने केलेल्या छळाचे काही अश्लील व्हिडिओ आणि चॅटिंग पोलिसांना मिळाले आहेत. आरोपी अधिकारी नाशिक जिल्हा परिषदेत विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे. एका पीडित महिलेने निनावी (नाव न सांगता) तक्रार दाखल केल्यानंतर हे गंभीर प्रकरण उघडकीस आले. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर आता ‘विशाखा समिती’ ने तपासाला सुरुवात केली आहे. एका वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याने अशा प्रकारे अनेक महिलांना त्रास दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता राज्य महिला आयोगाकडून देखील सखोल चौकशी करत आहे.आरोपी वरिष्ठ पदावर असल्याने त्याच्याविरोधात कोणीही बोलण्याची हिंमत करत नव्हते. मात्र, एका पीडित महिलेने धाडस दाखवून निनावी तक्रार दाखल केली आणि हे गंभीर प्रकरण समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेतील हा विभागप्रमुख अधिकारी गेल्या काही दिवसांपासून ऑफिसमधील सहकारी महिला आणि कर्मचारी महिलांचे लैंगिक छळ केला. जिल्हा परिषदेच्या एका विभागप्रमुखासह आणखी दोन अधिकारी या लैंगिक छळ प्रकरणात सहभागी असल्याची माहिती आहे. या सर्वांचा सविस्तर तपास सुरू आहे. एका पेन ड्राइव्हमध्ये पुराव्यासह ही निनावी तक्रार मिळाली होती. या पेन ड्राइव्हमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मेसेज आढळल्याने तात्काळ चौकशी समिती नेमण्यात आली.




