
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वाढीव वीज दरवाढीविरोधात एकवटले
सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की घालवायचे आहेत, हा प्रश्न पडला आहे. कारण शेतकऱ्यांची स्थिती उभ्या महाराष्ट्राला कळली आहे. आता व्यापाऱ्यांवर सुद्धा तशी वेळ येणार का, इतकी ही दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे, असे सांगत आज रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वाढीव वीज दरवाढीविरोधात एकवटले. जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, हॉटेल असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आले.
चुकीच्या पद्धतीने होणारी ही दरवाढ थांबवावी, असे सांगून रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात हॉटेल उद्योगाला व्यवसायाचा दर्जा दिलेला नाही. आम्ही तुम्हाला व्यवसाय दर्जा देतो, असे सांगितले. पण आजही महावितरणची बिले उद्योग व्यावसायिक दरानेच येत आहेत. हा अधिकचा भार पडतोय. याबद्दल शासन कुठेही गंभीर नाहीये. वीज नियामक आयोग घरगुती, उद्योजकांच्या वीज बिलाबाबत नवीन प्रयोग करत आहे. त्याला आमचा ठाम विरोध आहे. कोकणातलं पर्यटन फक्त कागदावर दिसत असून प्रत्यक्षात ते खूप कमी असताना वाढलेल्या वीजबिलांमुळे हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे सर्व क्षेत्रातील उद्योगजकांनी नाराजी व्यक्त केली आहे