परचुरी एस.टी. बसचा अपघात टळला; एस.टी. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापाचा भडका.

आबलोली : गुहागर-परचुरी (व्हाया पांगारी साडेवाडी) – चिपळूण ही नियमित धावणारी एस.टी. बस (गाडी क्रमांक एम.एच.१४ बी.टी. २४३८) आज सकाळी अपघातग्रस्त झाली. चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला कलंडली. या बसमध्ये अंदाजे ३० ते ३५ प्रवासी आणि विद्यार्थी होते. सुदैवाने बस रस्त्याच्या कडेला अडकली आणि मोठा अनर्थ टळला. कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

घटनेनंतर प्रवाशांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यासाठी चालक व स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत संकटमोचक भूमिका बजावली. बसमधील विद्यार्थी व प्रवासी अपघाताने थरकले होते, मात्र स्थानिकांच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. अपघात घडून दोन तास उलटल्यानंतरही एस.टी. आगाराकडून कोणतीही मदत पोहोचलेली नव्हती. ग्रामस्थांनी संपर्क साधल्यावर “क्रेन पाठवली आहे”, “कोणीही जखमी झालेलं नाही म्हणून कोणी तिकडे गेला नाही” असे बेजबाबदार उत्तर एस.टी. प्रशासनाकडून देण्यात आले. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

एस.टी. प्रशासनाचा हलगर्जीपणा ; ग्रामस्थ संतप्त* अपघात घडला की तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी करणे, प्रवाशांची विचारपूस करणे हे एस.टी. अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र परचुरी बस अपघाताच्या घटनेत एस.टी. प्रशासनाने केवळ दूरध्वनीवरून चौकशी करून हात झटकल्याचे चित्र आहे. ही मनमानी आणि उदासीनता प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ करणारी असून त्याविरोधात कडक पावले उचलण्याची गरज स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button