
दोन तासांच्या राड्यानंतर मनसेचा मोर्चा निघालाच
अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने आज सकाळी मोर्चा काढण्याचे ठरवले होते. या मोर्चाला पोलिसांनी सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारली होतीमोर्चाआधीच मोर्चेकऱ्यांची धरपकड केली. त्यामुळे राजकारणाचा पारा चढला होता. मनसे आणि ठाकरे गट मोर्चावर ठाम होते. विरोधकांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मोर्चाला परवानगी नाकारल्याने वातावरण अधिक चिघळत चालल्याचे लक्षात येताच दोन तासांनंतर या मोर्चाला परवानगी देण्यात आली. मराठी जनांच्या आवाजापुढे फडणवीस सरकार नरमले आणि परवानगी दिली अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांच्या या वागणुकीविरोधात सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता ते या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाल्याची माहिती मिळाली आहे.काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर परिसरात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला उत्तर म्हणून आज मनसे आणि ठाकरे गटाने प्रतिमोर्चा काढण्याचे निश्चित केले होते. या मोर्चाची सर्व तयारी करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी या मोर्चाला ऐनवेळी परवानगी नाकारली. मोर्चेकऱ्यांना नोटीसा धाडण्यात आल्या. तसेच त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना तर पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेण्यात आले.त्यानंतर सत्ताधारी गटातील मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील पोलिसांच्या या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांची कारवाई अत्यंत चुकीची आहे. आता मी देखील या मोर्चात सहभागी होणार आहे. हिंंमत असेल तर पोलिसांनी मला अटक करुन दाखवावी असे आव्हान दिले.
यानंतर मंत्री प्रताप सरनाईक स्वतः या मोर्चात सहभागी झाले. परंतु, त्यांना पाहताच मोर्चेकऱ्यांचा पारा चढला. त्यांनी लागलीच जय गुजरातच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. काहींनी त्यांच्या अंगावर बाटली भिरकावली. इतकेच नाही तर मोर्चातून निघून जा अशा घोषणाही देण्यात आल्या. तरी देखील मंत्री सरनाईक या मोर्चात सहभागी झाले. पोलिसांनी कुणाला अटक केली तर आजिबात सहन केले जाणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, आता हा मोर्चा सुरू झाला आहे. यामध्ये मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मनसे नेते अभिजीत पानसे सहभागी झाले आहेत. हा मोर्चा शांतीनगर भागाच्या आसपास पोहोचला आहे. या भागात जैन आणि गुजराती नागरिकांची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे शांतीनगरच्या वेशीवर मोर्चा रोखला आहे. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत. आम्हाला जोपर्यंत पुढे सोडले जात नाही तोपर्यंत आम्ही येथेच ठिय्या मांडू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.




