
आतामीरा-भाईंदर मधील व्यापाऱ्यांनी 3 जुलैच्या मोर्चासंदर्भात माफी मागितली
सध्या मीरा-भाईंदरमधील वातावरण चांगलेच तापलेले असताना आता व्यापाऱ्यांनी 3 जुलैच्या मोर्चासंदर्भात माफी मागितली आहे. तसं पत्रच त्यांनी पोलीस उपायुक्तांना पाठवलं आहे.
कोणत्याही समाजाच्या किंवा भाषिकांच्या भावना दुखावण्याचा आमचा प्रयत्न नव्हता. तरीही कोणाला वाईट वाटलं असेल तर आम्ही क्षमा याचना करतो असं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. पोलिसांना पाठवलेल्या पत्रामध्ये मीरा-भाईंदर व्यापारी संघाच्यावतीने पत्र पाठवण्यात आलं आहे. पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना व्यापाऱ्यांनी लिहिलेल्या पत्राचा विषय ‘कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्याबाबत’ असा आहे. या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात…
उपरोक्त विषयास अनुसरून आपणांस विनंती करतो की, आमच्या मीरा-भाईंदर व्यापारी संघाकडून दिनांक 3 जुलै 2025 रोजी आपणास मीरा भाईंदर क्षेत्रातील व्यापाऱ्यास मारहाण व शिवीगाळ केल्याच्या निषेदाविरोधात निवेदन पत्र देण्याकरिता आपल्या विभागात मोठ्या प्रमाणात व्यापारी संघ जमा झाला होता. आपणास निवेदन देण्यास आलेले सामाजिक व व्यापारी संघ यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाल्या कारणाने हे निवेदन देणे गरजेचे होते. त्याने व्यापारी संघातील भीती दूर होण्यास मदत होणार होती व तसे झाले ही.
आमचं उद्दीष्ट कोणत्याही समाजच्या विरोधात व पक्षाच्या किंवा कोणत्याही भाषा विरुद्ध नव्हतं. जर आमच्या व्यापारी संघाकडून 3 जुलै 2025 रोजी जमा झालेल्या व्यक्तीकडून कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी आमच्या व्यापारी संघाच्या वतीने आम्ही क्षमा याचना करतो. आमचा उद्दीष्ट फक्त आणि फक्त व्यापारी संघामधील भीतीचे वातावरण दूर करणे व पुन्हा आमच्यावर अशाप्रकारे हल्ले होऊ नये या करिता होता.