
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दहा एकरांत उभारणार ‘टेंट सिटी’
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांसमवेत देशभरातील उद्योजकही सहकुटुंब येण्याची शक्यता असल्याने, त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ‘टेंट सिटी’ उभारण्यात येणार आहे.ही टेंट सिटी तब्बल १० एकर परिसरात उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी लागणारा निधी सीएसआर आणि एमआयडीसी संयुक्तपणे उभारणार आहे.
काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये जिल्ह्यातील उद्योगांचे प्रश्न आणि नवीन गुंतवणूक याबाबत आढावा घेताना, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात एमआयडीसीचाही सहभाग दिसावा तसेच सिंहस्थात येणाऱ्या देशभरातील उद्योजकांना नाशिकचे महत्त्व अधोरेखित व्हावे, या हेतूने उद्योजकांसाठी टेंट सिटी उभारण्याबाबतची संकल्पना मांडली होती. ही टेंट सिटी कंपन्यांकडून मिळणाऱ्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) आणि एमआयडीसी अशा संयुक्त निधीतून उभारली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार एमआयडीसी बांधकाम विभागाकडून नुकतेच उद्योग विभागाला टेंट सिटीबाबतचे इतिवृत्त पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये 10 एकर जागेत टेंट सिटी उभारण्याबाबत नमूद केले आहे. तसेच टेंट सिटी शासनाच्या जागेवर उभारावी की, खासगी जागेत भाडेतत्त्वावर उभारावी, शहरातील कोणत्या भागात टेंट सिटी उभारावी, त्यासाठी किती कोटींचा निधी उभा केला जावा आदींचे मार्गदर्शन उद्योग विभागाकडे मागविण्यात आले आहे.