
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी महाराष्ट्र आणि मराठी लोकांविषयी गरळ ओकली.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी महाराष्ट्र आणि मराठी लोकांविषयी गरळ ओकली. मराठी लोक कुठला टॅक्स भरतात, आमच्या पैशावर तुम्ही जगत आहात, असे चिथावणीखोर विधान दुबेंनी केले आहे.हे बोलत असताना त्यांनी बिहार, गुजरातमध्ये असलेल्या उद्योगांचाही हवाला दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.दुबेंनी त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा एकदा सल्ला घेतला असता तर असे बोलताना शंभरवेळा विचार केला असता. किमान केंद्रातील त्यांच्याच सरकारकडून वस्तू व सेवा कराची म्हणजेच जीएसटी कलेक्शनची माहिती घेतली असती तर त्यांचे डोळे पांढरे झाले असते. जीएसटीमध्ये महाराष्ट्र हा देशात सातत्याने अव्वल स्थानी आहे. फार लांबची नाही, तर नुकत्याच संपलेल्या जून महिन्याची आकडेवारीही त्यासाठी पुरेशी आहे.सरकारच्या आकडेवारीनुसार, जून 2025 या महिन्यात महाराष्ट्रातून तब्बल 30 हजार कोटींहून अधिक जीएसटी कलेक्शन झाले आहे. दुबेंनी उल्लेख केलेला बिहार महाराष्ट्राच्या जवळपासही नाही. एवढेच नाही तर त्यांनीच उल्लेख केलेला गुजरातही तिसऱ्या क्रमाकांवर आहे. महाराष्ट्राचे कलेक्शन गुजरातपेक्षा तिपटीहून अधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकचे कलेक्शनही जेमतेम 13 हजार कोटी एवढेच आहे. त्यामुळे देशातील एकही राज्य महाराष्ट्राच्या जवळपास नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.