कामथे गावातील हरेकर वाडी येथे धक्कादायक प्रकार, उघडकीस आला. तब्बल ६० हजार लिटर केमिकलमिश्रित पाणी नदीत सोडलेदोन टँकर ताब्यात


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कामथे गावातील हरेकर वाडी येथे शनिवारी रात्री एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तब्बल ६० हजार लिटर केमिकलमिश्रित पाणी नदीत सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत दोन टँकर पोलिसांच्या ताब्यात दिले असून, तिन्ही टँकर चालक फरार झाले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शनिवारी रात्री सुमारे ९ वाजता कामथे हरेकरवाडी येथील एका धाब्याजवळील नाल्याजवळ पाच टँकर एका ओळीत उभे होते. सुरुवातीला तेथील नागरिकांना वाटले की चालक आणि वाहक जेवणासाठी थांबले असावेत. मात्र, काही तरुण रात्री खेकडे पकडण्यासाठी नदीकाठी गेले असता त्यांना तीन इंचाच्या पाईपद्वारे टँकरमधून केमिकलचे पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे लक्षात आले.

या तरुणांनी ही माहिती चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती अनंत हरेकर यांना दिली. हरेकर तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन टँकर अडवले. मात्र, ग्रामस्थांनी घेराव घालण्याचा प्रयत्न करताच तीन रिकामे टँकर घटनास्थळावरून पसार झाले, तर भरलेले टँकर आणि त्यावरचे चालकदेखील पळून गेले.

अनंत हरेकर यांनी तत्काळ पोलीस आणि महसूल प्रशासनाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही टँकर ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे.

हे केमिकल शिवनदीमार्गे वाशिष्ठी नदीत मिसळत असल्याने, याचा परिणाम चिपळूण शहर आणि आजूबाजूच्या गावांच्या नळपाणी योजनांवर होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणीय दृष्टीनेही ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या प्रकारामुळे नद्यांचे प्रदूषण, जलस्रोतांची अशुद्धता, तसेच मासेमारी आणि जैवविविधतेवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला असला तरी, फरार झालेल्या चालकांबाबत पोलीस तपास सुरू आहे. संबंधित टँकर कोणाच्या मालकीचे होते, त्यांनी हे केमिकल कुठून आणले आणि कुठे नेले जात होते, याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button