निर्यात धोरण वाढविण्यासाठी वार्षिक उलाढाल वाढविली पाहिजे. विक्रीसाठी उत्पादनाचा दर्जा आणि आकर्षक वेष्टन आवश्यक – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत.

रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) : आपण किती हजार कोटींची वार्षिक उलाढाल करतोय त्याच्यापेक्षा, भविष्यात किती हजार कोटींची करणार आहे, त्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. आपला उद्योग आपणच वाढवायचा असतो. तो दुसऱ्यावर अवलंबून होत नसतो. निर्यात धोरण वाढविण्यासाठी वार्षिक उलाढाल वाढविली पाहिजे. त्यासाठी विक्रीसाठी उत्पादनाचा दर्जा सादरीकरणासाठी आकर्षक वेष्टन आवश्यक असते, असे मार्गदर्शन उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनाइजेशन, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ (एमएसएसआयडीसी) व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रिव्हर्स बायर सेलर कार्यक्रमात “आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी संवाद” विषयावर येथील हॉटेल सावंत पॅलेस येथे उद्योगमंत्री डाॕ. सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा आज झाली. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, ऋषीकांत तिवारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर उपस्थित होते. उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, राज्यातील विविध मोठ्या नावाजलेल्या उद्योगपतींशी बोलताना, आपल्या कोकणातला माणूस, आपल्या महाराष्ट्रातला माणूस एवढ्या उच्च पातळीवर का जाऊ नये, ही प्रमाणिक इच्छा उद्योग मंत्री म्हणून माझी आहे. जिल्ह्यातला मत्स्यउद्योग हा सर्वात मोठा व्यवसाय आहे. मिरकरवाडा जेटीवर साडेतीन हजार कोटींची वार्षिक उलाढाल होते. जिल्ह्यामध्ये किमान दहा ते बारा हजार कोटींची वार्षिक उलाढाल होते. दुसरा आंबा व्यवसाय हा बारा महिन्यात तीन महिने असतो. जिल्हा उद्योग केंद्राने आंबा निर्यातीसाठी प्रयत्न केला पाहिजे. आंबा निर्यात करताना जे संकट येते, ते दूर केले पाहिजे. यामधून फार मोठा पैसा निर्माण होऊ शकतो.

आज सकाळी चिपळूणमध्ये खैराची झाडं शेतकऱ्यांना मोफत वाटली. खैर काय करतो, हा जर व्यवसाय आपण बघितला, तर खैराचं झाड एकदा लावलं की वर्षांनुवर्षे टिकते. एकदा लावलेलं झाड अनेकवेळा आपल्याला कातासाठी आणि औषधासाठी वापरलं जातं, रंगासाठी वापरलं जातं. साडेपाच लाख झाडं दिलेली आहेत. पुढच्या वर्षी माझ्याच रत्नागिरीतला माणूस काताचा, रंगाचा कारखाना सुरु करु शकतो, यासाठी या कार्यशाळेचा उपयोग व्हावा.

पारंपारिकतेतून बचत गटांनी बाहेर आलं पाहिजे. निर्यातीवर आधारित घटक आणले पाहिजेत. आपल्याला महाराष्ट्राच्या आर्थिक जडणघडणीला दृढ बनवायचे आहे. जांभूळ, करवंदं, काजू याचं सरबत बनविणारं युनिट आपल्या रत्नागिरीत सुरु व्हायला हवे. त्यासाठी दृढ आत्मविश्वास ठेवा, आत्मचिंतन करा, असेही उद्योगमंत्री म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी, भारत सरकारने सर्वांना ओएनडीसी पोर्टलवर उत्पादन विक्रीसाठी प्लॅटफार्म दिला आहे, असे सांगून सर्व क्षेत्रात विश्वास आणि निष्ठा असायला हवी, असे म्हणाले. 000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button