
साडेपाच लाख खैर रोपांचे शेतकऱ्यांना मोफत वाटप. वणवामुक्त अभियानामध्ये शेतकऱ्यांनी जबाबदारी घ्यावी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
रत्नागिरी, दि. ५ : प्रॅक्टिकली अभ्यास केलेला शेतकरी देखील ज्ञानापेक्षा मोठा असतो, हे देखील अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. वणवामुक्त अभियान जर, आपल्याला राबवायचे असेल, तर शेतकऱ्यांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांनी कुठेतरी ठरवलं पाहिजे, माझ्या शेतामध्ये आणि माझ्या बाजूच्या शेतामध्ये कधीही वणवा लागणार नाही, याची जबाबदारी घेतली पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांनी एकामेकाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर रोपांचे मोफत वाटप व वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमास आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, रमेश कदम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, उपवन सरंक्षक गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी रणजीत गायकवाड, सहाय्यक वन संरक्षक प्रियांका लगड आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, आपण सर्वांनी विशेषत: शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर वणवा थांबवू शकतो. आपल्या घरापासून, आपल्या बागेपासून, आपल्या जमिनीपासून जर सुरुवात केली तर 35 ते 40 टक्के वणवे आपोआप कमी होतील. जो जाणीवपूर्वक वणवा लावतो अशांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कशा पद्धतीने वणवे लागतात, कशा पद्धतीने थांबवले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये कार्यशाळा घ्या. प्राण्यामुळे दुर्घटना घडली तर देणाऱ्या मदतीत शासनाने 25 लाखांपर्यंत वाढ केली आहे. गेलेला माणूस परत येणार नाही, पण भविष्याच्या जीवनामध्ये काहीतरी करू शकतो. शेतकऱ्यांकडे 4 गुंठे, 10 गुंठे, 5 गुंठे, 15 गुंठे जागा आहे. त्यालाही चांगल्या पद्धतीची खैराची जर झाडं आपण दिली, तर काही कालावधित तो देखील सधन होऊ शकतो.
ज्या शेतकऱ्याला खैराची लागवड करायची आहे, त्याला मोफत ते झाड मिळालं पाहिजे ही भूमिका डीपीसीच्या माध्यमातून घेतली. महाराष्ट्रातलं पहिलं वणवामुक्ती अभियान रत्नागिरीमध्ये आपल्या जागेपासून सुरु करु या, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नाविण्यपूर्ण कार्यक्रम घेऊन गावा गावापर्यंत आपण पोहोचू शकतो. त्यामध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. प्रत्येक शेतकऱ्याची ही जबाबदारी आहे, प्रत्येक बागायतदाराची जबाबदारी आहे, अशा पद्धतीने आपण कामाला लागूया. भविष्यामध्ये अजूनही खैराची झाड जर काही द्यायची असेल तर नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी दिली जाईल, असा शब्दही त्यांनी दिला. आमदार श्री निकम म्हणाले, खैर वृक्ष वाटप आणि वणवामुक्ती संबंधीची आजची कार्यशाळा आयोजित करण्याचा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या बागा स्वच्छ ठेवल्या, चांगल्या केल्या तर वणव्याचे प्रमाण आपोआप कमी होईल. वणव्याला देखील विमा मिळावा, अशी मागणी करुन ते म्हणाले, सर्वात आधी वणवा लागू नये, हीच काळजी आपण घेतली पाहिजे. शेतकऱ्यांनी जर खैर लावला तर दरवर्षी त्याचा एक उत्पन्नाचा स्रोत आपल्याकडे निर्माण होत राहील.
खैर शेतीकडे बघत असताना, वृक्ष तोडत असताना, वृक्ष लावण्याची जबाबदारी देखील घ्यायची आहे. ज्या ज्या देवराई आहेत, त्या त्या देवराईमध्ये काही लागवड करायला अडचणी येत असतील तर सगळ्या देवराईमध्ये लागवडीची सक्ती करण्याची भूमिका आपण ठेवली तर तिथेही लागवड चांगल्या पद्धतीने होईल. यावेळी शहानवाज शहा यांनी मार्गदर्शन केले. वन विभागामार्फत साडेपाच लाख खैर जातीच्या रोपांचे वाटप शेतकऱ्यांना मोफत करण्यात आले. त्यातील प्रातिनिधिक वाटप पालकमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले.000