
शक्तिपीठ महामार्गासंदर्भात येथील लोकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांची डोकी भडकाविण्याचे काम सुरू -पालकमंत्री नितेश राणे.
शक्तिपीठ महामार्गासंदर्भात येथील लोकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांची डोकी भडकाविण्याचे काम सुरू आहे. हे मी कदापि खपवून घेणार नाही. शक्तिपीठ महामार्ग होताना यामध्ये जो बाधित होईल अशा प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच शक्तिपीठ महामार्ग होणार आहे.आत्ता असलेला शक्तिपीठ महामार्गाचा प्लॅन आहे तो आपल्यासाठी उपयोगाचा नाही. हा प्लॅन १०१ टक्के आम्ही बदलणारच! शक्तिपीठ मार्ग लोकांच्या हितासाठी आहे. तो मार्ग गोव्याकडे न जाता झिरो पॉईंट किंवा मळगांवकडे कसा जाईल यासाठी आपले प्रयत्न असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शक्तिपीठ संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आहे. तसेच कालच मी एमएसआरटीसी डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत. त्यांच्याशी ही माझी चर्चा झाली.जिल्ह्यात ज्या भागात या महामार्गाला विरोध होत आहे. तेथील नागरिकांच्या मनात गैरसमज आहे. त्यांना आपण शासनाची भूमिका पटवून देणार आणि प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच हा महामार्ग होणार आहे. आता असलेल्या महामार्गाचा जो काही प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमचं बांदा शहर आणि काही भाग बाधित होत आहेत किंवा बाजारपेठ बाधित होते. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा हा प्लॅन आपल्याला मान्य नाही. तसेच या प्लॅननुसार हा मार्ग थेट गोव्यात जोडला जाणारा असल्याने जिल्ह्याला या मार्गाचा फायदा काय? असा प्रश्न करत जो काही प्लॅन आहे तो एकशे एक टक्के आम्ही बदलणारच आहे.