
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ २५ टक्के प्राध्यापक, अनेक पदे रिक्त.
प्राध्यापकांची कमतरता आणि सुविधांच्या अभावामुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटिसीला सामोरे जावे लागले आहे. राज्य शासनाकडून अपेक्षित पदभरती झाल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे राज्यातील उत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालय म्हणून गणले जाईल, असे मत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केले.वैद्यकीय परिषदेने राज्यातील बहुतांशी वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यामध्ये रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे. रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे हे दुसरे वर्ष सुरू आहे. मात्र अजूनही महाविद्यालयातील आवश्यक प्राध्यापकांपैकी फक्त २५ टक्के प्राध्यापक काम करत असल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले.
राज्य शासन वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या कर्मचार्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करणार आहे. मात्र महाविद्यालयातील वर्ग १ मधील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक ही पदे भरण्यासाठीची सपूर्ण प्रक्रिया राज्य शासनस्तरावरुनच करण्यात येणार आहे. या पदांसाठी पाठपुरावा करण्यात येत असून अद्याप ही पदे उपलब्ध झालेली नाहीत. तसेच अधिष्ठाता स्तरावर भरण्यात येणार्या सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व वरिष्ठ निवासी प्राध्यापक या पदांसाठी रत्नागिरीत येणार्यांची संख्या कमीच आहे.www.konkantoday.com