
मुंबई-गोवा महामार्गावरील अडथळा ठरणारी लांजातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवली.
लांजा नगर पंचायत कार्यक्षेत्रातील लांजा शहरातील अतिक्रमणे ३ जुलैपर्यंत हटवावीत, अन्यथा पोलीस बंदोबस्तात ती हटवण्यात येतील. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात कारवाई सुरू केली.कारवाईची सुरूवात तहसीलदार कार्यालयासमोरील परिसरात केलेल्या अतिक्रमणांपासून करण्यात आली. त्या ठिकाणी असणार्या टपर्या, दुकानाचे फलक हटवण्यात आले. कारवाई सुरू होताच आजूबाजूच्या परिसरातील दुकानांचे साहित्य काढून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. कारवाई करताना व्यावसायिकांच्या डोळ्यांदेखत शेड काढून टाकण्यात आल्याने त्यांना मात्र अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असून शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुतर्फा असलेली रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com