
धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट, संशयिताच्या पत्नीचा आरोप;
धारगळ गोवा येथे महाविद्यालयीन युवकावर झालेल्या ॲसिड हल्ला प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. आपल्या मुलीला तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ पाठवून जखमी वृषभ शेट्ये व तिची आई विद्या शेट्ये यांच्याकडून ब्लॅकमेल केले जात होते.त्या नैराशेतूनच तिने आत्महत्या केली. त्यामुळे या दोघांवरही माझ्या मुलीस आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल आणि अश्लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल केल्याच्या गुन्ह्याखाली ती अल्पवयीन असल्याने पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार ॲसिड हल्लाप्रकरणी गोवापोलिसांच्या अटकेत असलेला संशयित आरोपी नीलेश देसाईंची पत्नी नेहा देसाई हिने दोडामार्ग पोलिसांकडे केली आहे.तसेच आपली मुलगी निलाक्षी व वृषभ हिचे व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्राम संभाषण, अश्लील फोटो व व्हिडीओ पोलिसांना दिले. शिवाय आपल्या पतीला केवळ संशयावरून अटक केली आहे; पण या हल्ल्याशी त्यांचा काहीही संबंध नाही, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
आपल्या मुलीचे आणि वृषभ शेट्ये याचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात बिनसल्याने आपली मुलगी निलाक्षी हिने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस वृषभच जबाबदार असल्याचा राग मनात ठेवून त्याचा बदला घेण्यासाठी नीलेश देसाई याने तीन दिवसांपूर्वी वृषभवर धारगळ येथे ॲसिड हल्ला केला होता. त्यांनतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेने संपूर्ण गोवा राज्यात खळबळ उडाली होती. सध्या तो पेडणे पोलिसांच्या अटकेत आहे. मात्र, आता संशयितांच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.