
तो कुरियवाला नाही तर बॉयफ्रेंड’ त्या दिवशी बिनसलं म्हणून… कोंढवा प्रकरणात जबरदस्त ट्विस्ट
पुण्यातील कोंढवा परिसरातील कथित बलात्कार प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण लागले आहे. सुरुवातीला एका डिलिव्हरी बॉयने घरात घुसून अतिप्रसंग केल्याची २५ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.मात्र, पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अतिप्रसंग करणारा व्यक्ती डिलिव्हरी बॉय नसून, चक्क तरुणीचा प्रियकरच होता! विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे शारीरिक संबंध होते आणि ‘लव्ह, सेक्स अन् धोका’ अशा या ट्रायअँगल समोर आला आहे. तरुणीनेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी फिर्याद रचल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कल्याणीनगर येथे एका आयटी कंपनीत कामाला असून, दोन वर्षांपासून कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत आपल्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी, बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणी एकटीच घरी होती, कारण तिचा भाऊ परगावी गेला होता. याच संधीचा फायदा घेत, तिचा प्रियकर तिच्या खोलीवर आला. मात्र, सोसायटीच्या गेटवर तो कुरिअर बॉय असल्याचे सांगत तो आत शिरला.आत आल्यावर दोघांमध्ये शारीरिक संबंधांवरून वाद झाला. मुलाने शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, पण मासिक पाळीचे कारण देत तरुणीने स्पष्ट नकार दिला. यावरून तरुणाचा संयम सुटला आणि त्याने प्रेयसीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. तरुणाने जबरदस्ती करत अर्धवट शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने सेल्फी काढून काढता पाय घेतला. झालेल्या प्रकारामुळे संतप्त तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि एका अनोळखी कुरिअर बॉयने आपल्यावर अतिप्रसंग केल्याची खोटी कहाणी रचली. विशेष म्हणजे, तक्रार देण्याआधी तिने स्वतःच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील सर्व डेटाही डिलीट केला होता, जेणेकरून पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळू नये. तिने पोलिसांना आरोपीचा मोबाईलमध्ये फोटो काढला असून, ‘मी परत येईन’ असा मेसेज मोबाईलमध्ये लिहिला असल्याचीही खोटी माहिती दिली होती.
पीडितेच्या तक्रारीनंतर पुणे परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाच्या तपासासाठी पुण्यापासून दिल्लीपर्यंत तब्बल २०० पोलिसांची पथके कार्यरत होती. शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, हजारो कॉल रेकॉर्ड्स तपासण्यात आले आणि सर्व महत्त्वाच्या कुरिअर कंपन्यांच्या दिल्ली कार्यालयांशी संपर्क साधून त्यांच्या डिलिव्हरी बॉयची माहितीही मागवण्यात आली.
पोलिसांनी तरुणाला अटक केल्यानंतर या प्रकरणातील खरा ‘लव्ह, सेक्स अन् धोका’ हा ट्रायअँगल समोर आला. तक्रारदार तरुणी आणि तिच्यासोबत असलेला तरुण गेल्या दीड वर्षांपासून मित्र आहेत. इतकेच नाही, तर दोघांचे कुटुंबीयही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. तरुण अनेकदा तरुणी घरी एकटी असताना तिच्या घरी जायचा. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडे आपली खरी ओळख उघड होऊ नये म्हणून, त्याने प्रत्येक वेळी ‘कुरिअर बॉय’ असल्याचे सांगायचे आणि तरुणीही फोन आल्यावर त्यास दुजोरा द्यायची, असे तपासात उघड झाले.