
तुमच्या हातात विधानभवनात सत्ता असेल, पण आमच्याकडे.”, राज ठाकरेंचा भाजपाला मोठा इशारा!
:* गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्यांवरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अखेर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने आज मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या वरळीतील डोम या ठिकाणी ठाकरे बंधूंचा हा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधूं अनेक वर्षांनंतर एका व्यासपीठावर येत असल्यामुळे या मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं.
दरम्यान, या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा इशारा दिला आहे. ‘तुमच्या हातात सत्ता असेल, पण ती सत्ता विधानभवनात, आमच्याकडे सत्ता रस्त्यावर आहे’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण फक्त मोर्चाच्या चर्चांनीच माघार घ्यावी लागली. मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं की कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. जे बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.“खरं तर आजच्या मेळाव्यालाही कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा आहे. माझ्या मराठीकडे आणि महाराष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहायचं नाही. खरं तर हा प्रश्नच अनाठायी होता.
मात्र, हिंदी सक्तीचा विषय कोठून आला? ते मला कळलं नाही. हिंदी सक्ती ही कोणासाठी? लहान मुलांसांठी हिंदी सक्ती का? कोणाला विचारायचं नाही, काही नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, फक्त आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, मग आम्ही लादणार, तुमच्या हातात सत्ता असेल, पण ती सत्ता विधानभवनात, आमच्याकडे सत्ता रस्त्यावर आहे” , असा इशारा राज ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे.