
रत्नागिरीत ६ जुलै रोजी ‘शक्तिमंदिर ते भक्तीमंदिर‘ वारीचे आयोजन.
रत्नागिरी : अनेक वर्षे विठुरायाच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या, परंतु काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणे शक्य नसल्याने रत्नागिरीमध्ये आषाढी वारीचे आयोजन करण्यात येत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून ६ जुलै रोजी रत्नागिरी शहरात आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘शक्तिमंदिर ते भक्तीमंदिर‘ या संकल्पनेने या वारीचे आयोजन केले जात आहे.अभंग, नामजप, नित्यपाठ, विठूनामाचा जयजयकार करत ही वारी निघणार आहे. वारकरी, भाविकांनी बहुसंख्येने पारंपरिक वेशात, टाळ-मृदुंग, पताकांसह सहभागी होत वारीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आषाढीवारी आयोजकांनी केले आहे.
या वारीची सुरुवात रत्नागिरीतील सुप्रसिद्ध मारुती मंदिर म्हणजेच ‘शक्तिमंदिर‘ येथून होईल, तर सांगता प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या येथील श्री विठ्ठल मंदिर अर्थात ‘भक्तीमंदिर‘ येथे होणार आहे. रविवारी (६ जुलै) सकाळी ६:३० वाजता मारुती मंदिरातून वारीला प्रारंभ होईल. या वारीदरम्यान विठ्ठलभक्तांना रिंगणाचा आनंद देखील घेता येणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत विठू माऊली आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पंढरीची वारी. आषाढी एकादशी आली की, वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागते. या वारीला जवळपास ८०० वर्षांची परंपरा आहे. आयुष्यात एकदा तरी वारी घडावी, अशी माणसाची मनोमन इच्छा असते. प्रापंचिक समस्या, व्यावहारिक अडचणी, शारीरिक मर्यादा यामुळे वारीला जाणं होत नाही. त्यामुळे मनातली वारीची ओढ कमी होत नाही. असे अनेक वारकरी रत्नागिरीतल्या वारीत सहभागी होतात. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळा।’ या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त विठ्ठलभक्तांनी या वारीमध्ये पारंपरिक वेशात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या ॲड. रुची महाजनी यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला कौस्तुभ सावंत, विराज सावंत, नंदू चव्हाण, सुहास ठाकुरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. पंढरपूरच्या वारा अनुभव घेण्याची संधी रत्नागिरीत लाभणार असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.