
कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधारांचा इशारा!
मुंबई :* गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी असला तरी कोकण, घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, आज रत्नागिरी, रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.मागील आठवड्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. प्रामुख्याने घाट परिसर कोकणात पावसाचा जोर आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भागात गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, जगबुडी नद्यांनी पाण्याची इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रोहा, कोलाड, वाकण, खारघाव, खेड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरीसह रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसरात शुक्रवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार या कालावधीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे घाट परिसरातही पावसाचा जोर आहे. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. ही प्रणाली जैसलमेर, कोटा, गुना, सतना, दलतोंगज, दिघा ते पूर्वमध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या परीसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण झारखंड आणि परिसरावर ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील काही भागात शनिवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.*१० जुलैपर्यंत सर्वाधिक पाऊस*हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, ४ ते १० जुलै या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी अनेक भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. पावसाचा जोर प्रामुख्याने कोकण, घाटमाथ्यावर राहील. याचबरोबर विदर्भातही काही प्रमाणात पाऊस पडेल.