
केवळ आर्थिक फायद्यासाठी एका आईने आपल्या पोटच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला विकल्याचा धक्कादायक प्रकार, दापोलीतील संतापजनक घटना
दापोली तालुक्यात येथे एक काळीज हलवणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ आर्थिक फायद्यासाठी एका आईने आपल्या पोटच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला विकल्याचा धक्कादायक प्रकार दापोली पोलिसांच्या लक्षात आला असून या प्रकरणी संबंधित दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास गुहागर येथील एस.टी. स्टँडसमोर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित महिलेस आर्थिक अडचणी होत्या. या पार्श्वभूमीवर तिने आपल्या पाच वर्षांच्या मुलाला गुहागर तालुक्यातील बोऱ्या कारखळ येथील सत्यवान दत्ताराम पाळशेकर (वय ५२) याला विकले. सत्यवान पाळशेकर याने मुलाला खरेदी केल्याचे कबूल केल्याने हा प्रकार अधिकच गंभीर झाला.
या घटनेनंतर दापोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलांच्या कल्याण व संरक्षण अधिनियम २०१५ (जेजे अॅक्ट) अंतर्गत कलम ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. याबाबतचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.