
उद्यमनगर पटवर्धनवाडी रस्त्यावर खड्डेच खड्डे; रस्त्याला तलावाचे स्वरूप.
रत्नागिरी शहरालगत असलेल्या उद्यमनगर पटवर्धनवाडी येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. मुसळधार पावसात या रस्त्यावर पाणी साचल्याने या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे. वाहन चालकांना विशेष करून महिला वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रत्नागिरी नगर परिषद आणि शिरगाव ग्रामपंचायत हद्दीवर असलेल्या या रस्त्याचे काम कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पावसाळ्या पूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिने झाले तरी देखील नगर परिषद किंवा शिरगाव ग्रामपंचायतीचा एकही अधिकारी किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा येऊन साधी चौकशी देखील करून गेलेला नाही. सध्या नगर परिषदेवर प्रशासक राज असल्याने नागरिकांची पंचाईत होत आहे. मात्र शिरगाव ग्रामपंचायत मधील सदस्य याच भागातील असूनही इथल्या रस्त्यांची डागडुजी न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये या रस्त्याचा व गटारांचाप्रश्न मिटला नाही तर पालकमंत्र्यांच्या समोर उपस्थित राहून आपल्या संतप्त भावना व्यक्त करणार आहेत. याला शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य जबाबदार असतील असे बोलले जात आहे.