
आत्महत्या करायची असती, तर नाशिकमध्ये केली असती; रत्नागिरीत कशाला आली?” व्यथित वडिलांचा थरारक सवाल आणि घातपाताचा ठपका.
रत्नदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात पडून मृत्यू झालेल्या सुखप्रीत कौर या तरुणीच्या मृत्यूने एकच खळबळ उडवून दिली आहे. सुखप्रीतच्या मृत्यूमागील कारणांचा तपास सुरू असतानाच तिचे वडील प्रकाशसिंह कौर यांनी थेट घटनास्थळी येऊन उपस्थित केलेले प्रश्न आणि भावना यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.“माझी मुलगी आत्महत्या करणार नव्हती… तिचा घात झाला आहे!” असा ठाम आरोप करत त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. घटनास्थळी उभे राहून त्यांनी भावुक स्वरात विचारले, जर तिला आत्महत्या करायचीच असती, तर ती नाशिकमध्ये केली असती. रत्नागिरीला का आली असती? सुखप्रीत ही नाशिकमधील आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होती. काही दिवसांपूर्वीच ती नाशिकहून रत्नागिरीकडे रवाना झाली होती. तिच्या घरी एक चिठ्ठी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये तिने लिहिले होते की, “मी संकटात अडकले आहे. मी कोणाला सांगू शकत नाही. मी काय करू? मला समजत नाही…”
ही चिठ्ठी तिच्या मानसिक अवस्थेची कल्पना देणारी असली तरी, वडिलांच्या मते ती इतकी कमजोर नव्हती की असा टोकाचा निर्णय घेईल.सुखप्रीतच्या मृत्यूमागे एका विशिष्ट तरुणाचा हात असल्याचा थेट आरोप प्रकाशसिंह यांनी केला आहे.“हरामखोराने फोन केला… तोच तिला सतत फोन करत होता,” त्यांनी या तरुणाचे नाव उघडपणे घेतले. हा तरुण रत्नागिरीत आयडीबीआय बँकेत कार्यरत आहे. “त्याच्यामुळेच माझी लेक रत्नागिरीला आली होती. त्याने प्रेमाचे नाटक केले, तिच्या भावना फसवल्या आणि अखेर तिचा घात केला, असा आरोप त्यांनी केला. सूत्रांच्या माहितीनुसार, बेंगळुरूमधील मणिपाल बँक प्रशिक्षणादरम्यान दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर या तरुणाला सुखप्रीतने दोन वेळा रत्नागिरीला येऊन भेट दिल्याचे तिच्या मैत्रिणींनी सांगितले आहे.या प्रकरणातील अनेक गोष्टी अद्याप अस्पष्ट आहेत. मृत्यूपूर्वीच्या कॉल रेकॉर्ड्स, संपर्कात असलेल्या व्यक्ती, आणि अन्य डिजिटल पुरावे यांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. कुटुंबीयांच्या मते, हा केवळ आत्महत्येचा नाही तर भावनिक फसवणूक, मानसिक छळ किंवा दबावामुळे घडलेला प्रकार असण्याची शक्यता आहे.