
पाच जुलैला मुंबईतील मेळाव्याला वाजत-गाजत या! शिवसेना व मनसे कडून आवाहन
शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्ती आणि त्रिभाषा धोरणाला विरोध करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यानिमित्ताने एकत्र आले आणि त्यांनी जोरदार विरोध केला.यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार एक पाऊल मागे आले आणि त्यांनी त्रिभाषा धोरणाबाबतचा शासन निर्णय मागे घेतला. याविरोधात नियोजित मोर्चाऐवजी आता पाच जुलैला ठाकरे बंधुंचा विजयी मेळावा होणार आहे.
या विजयी मेळाव्यासाठी वाजत गाजत या आम्ही फक्त आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुमचाच असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकत्रित निमंत्रण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी काल दिले होते. त्यानंतर आज ठाकरे बंधुंनी दुसरे एकत्रित निमंत्रण दिले आहे.एका जाहीर झालेल्या पोस्टवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची एकत्रित नावे आहेत. ठाकरे बंधुंनी पाच जुलैला मुंबईत एकत्र विजयी मेळाव्याचे आवाहन केले होते. त्यावर दुसऱ्या निमंत्रणात “महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं आहे? मग ही सुरुवात आहे! ” असे या जाहीर खुल्या निमंत्रणात म्हटले आहे.
दरम्यान, वरळीतील एनएससीआय येथे कार्यक्रमस्थळाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, आशिष चेंबुरकर, सुनील शिंदे, तर मनसेकडून बाळा नांदगावर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार यांनी आले होते.मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये पाच जुलैला मुंबईतील मेळाव्याला वाजत-गाजत या असे म्हटले आहे, यासह खाली राज-उद्धव ठाकरे असे दोघांचे एकत्रित आवाहन छापलेले आहे.