
पॉलिटेक्निकला प्रवेश घेताय? अर्ज करण्यासाठी ४ जुलैपर्यंत अखेरची संधी!
मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २ ते ४ जुलै या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी ही अखेरची मुदतवाढ आहे.
दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया २० मे २०२५ रोजी सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रथम २६ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता, अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीसाठी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला होता.
मात्र अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली असली तरी शुल्क भरून अर्ज निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्याची दखल घेत विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी ४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी २ ते ४ जुलै या काळात अर्ज दाखल करू शकणार आहेत. या मुदतीत अर्ज निश्चित करणाऱ्या उमेदवारांचाच अंतिम गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येणार आहे, असेही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
१ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी ३० जूनपर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये १ लाख ५८ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ३८ हजार २९८ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेत या प्रक्रियेला आणखी तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी या वर्षी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेशाच्या चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी पहिला पसंतीक्रम, दुसऱ्या फेरीसाठी पहिले तीन पसंतीक्रम, तिसऱ्या फेरीसाठी पहिले सहा पसंतक्रम, तर चौथ्या फेरीसाठी सर्व पसंतीक्रम अनिवार्य असणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॅप फेरीसाठी पसंतीक्रम अर्ज भरुन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे अभियांत्रिकी पदविक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.