
ठाकरे बंधू एकत्र येण्यास आमचे काही देणे घेणे नाही. परंतु, राज ठाकरेला मातोश्रीचा एक भाग देणार का? नारायण राणे यांचा सवाल
ठाकरे बंधू एकत्र येण्यास आमचे काही देणे घेणे नाही. परंतु, राज ठाकरेला मातोश्रीचा एक भाग देणार का? असा खोचक सवाल माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे शिवसेनेचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
ते पुढे म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तरी, त्यांना राजकारणात काहीही भविष्य नाही. यांना जर भविष्य असते तर ते दोघे वेगवेगळे का झाले. त्यांच्यामध्ये फूट का पडली? यांनी मराठी माणसांसाठी काय केले. मुंबईत मराठी माणसे किती राहिले आहेत.
राज्यात त्रिभाषा सुत्री धोरणाचा जीआर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला. आणि त्याचा आनंद ठाकरे शिवसेना साजरा करणार आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. स्वत:चे काही कर्तृत्व नाही, आणि नको त्या विषयात श्रेय घेण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. उलट ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले पाहिजे होते. परंतु ते मेळावे घेत बसले आहेत.
मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात ते केवळ दोन दिवस मंत्रालयात गेले. मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी काय केले, हे त्यांनी सांगावे. ज्या मराठी माणसांनी शिवसेनेसाठी ताकद दिली, आधार दिला. त्या मराठी माणसांच्या रोजगारासाठी पोटापाण्यासाठी यांनी काय केले? मराठी आणि हिंदुत्वावर बोलण्याचा उद्धव ठाकरे यांना नैतिक अधिकार नाही. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेवढे मिळविले, तेवढे उद्धव यांनी अडीच वर्षांत साफ करून टाकले. ठाकरे यांची शिवसेना आता राहिलेली नाही, ती आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना झाली आहे. यांची शिवसेना डुप्लिकेट आहे. ओरीजनल शिवसेना शिंदे यांच्याकडे आहे. राज ठाकरे शिवसेनेत आले तर उद्धव यांचे अस्तित्व राहणार नाही, असा दावा राणे यांनी यावेळी केला