
अवजड वाहतूकदार दारांच्या संपामुळेराज्यात दूध, भाजीपाला, अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवण्याची शक्यता
राज्यभरात अवजड वाहतूकदार संघटनांनी इ-चलन प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्यायकारक दंड आणि विविध मागण्यांसाठी मंगळवारी रात्रीपासून संप पुकारला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संप न करण्याचे आवाहन केल्यानंतरही अवजड वाहतूकदार संघटना संपाबाबत ठाम आहेत.
त्यामुळे राज्यात अत्यावश्यक सेवेच्या पुरवठ्यावर परिणाम होणार असून दूध, भाजीपाला व अत्यावश्यक वस्तूचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.
राज्यातील माल व प्रवासी वाहन चालकांना जबरदस्तीने दंडवसुली करणे, ईचलनाच्या नावाखाली आर्थिक लूट होते. वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाद्वारे चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कारवाईविरोधात आणि अवजड वाहनांवर क्लिनर ठेवण्याच्या सक्तीविरोधात हा संप सुरू केला आहे.२५ जून रोजीच वाहतुकदारांच्या भेटीला आझाद मैदानात उद्योग मंत्री उदय सामंत आले होते. तर, २६ जून रोजी वाहतूक व्यावसायिकांच्या ई-चलन विषयक समस्यांचे निराकरण करण्याची राज्य सरकारची भूमिका असून त्यासाठी परिवहन विभागाने संबंधितांची समिती गठीत करावी व एका महिन्याच्या आत समितीने अहवाल सादर करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. परंतु, एका महिन्याचा कालावधी देण्यात आल्याने आणि प्रलंबित मागण्या मान्य न केल्याने १ जुलै रोजीपासून अनिश्चित काळापर्यंत संप पुकारला आहे.