
उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, यमुनोत्री धाममध्ये रस्ते खचले, महाराष्ट्राच्या 200 भाविकांसह 600 जण अडकले
उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुनोत्री धाम परिसरात रस्ते खचले, नद्यांना पूर आला आहे. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातील 600 भाविक यमुनोत्रीला अडकले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 200 पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती आहे. हवामान विभागाने यमुनोत्री परिसरासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे असून सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
उत्तराखंडमध्ये फिरायला गेलेले महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकल्याची माहिती मिळाली आहे. या पर्यटकांमध्ये 50 जण मुंबईतील असल्याची प्राथमिक माहिती आहे. यमुनोत्री धाममध्ये हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस अति मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हिमाचल आणि उत्तराखंडमधील अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गाड्या वाहून गेल्या, काही घरांमध्ये पाणी शिरले, तर काही ठिकाणी घरं जमीनदोस्त झाली आहेत. यमुनोत्री इथे सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक यात्रेकरू अडकले आहेत.
अडकलेल्या पर्यटकांना रेस्क्यू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे परिस्थिती खूप बिकट असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातील २०० पर्यटकांमध्ये मुंबईतील ५० असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित पर्यटक कुठले आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. आजही यमुनोत्री धामला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रस्ते बंद झाल्याने प्रशासनाने यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. यमुना आणि गंगा नद्यांचे जलस्तर वाढल्याने पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. देहरादून, नैनीताल, हरिद्वार, टिहरी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, चंपावत आणि उधमसिंग नगरसह अनेक जिल्ह्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर एवढा जास्त आहे की, रस्ते खचले असून, काही ठिकाणी दरड कोसळल्यामुळे मार्ग बंद झाले आहेत. प्रशासनाने यमुनोत्री धामचा रस्ता तात्काळ बंद केला आहे.
या अडकलेल्या पर्यटकांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला असल्याने बचाव कार्य अधिक आव्हानात्मक बनले आहे. बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली असून, हेलिकॉप्टरच्या सहाय्यानेही मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणा सतर्क असून, पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबवल्या जात आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना यात्रेसाठी पुढील सूचना येईपर्यंत प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.