
श्री मारूती – गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी, रत्नागिरी आयोजित, जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अकबर अलीला दुहेरी मुकुट
श्री मारूती – गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शताब्दी महोत्सवानिमित्त, आयोजित जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अकबर अलीला दुहेरी मुकुट पटकावला. या स्पर्धेचे रत्नागिरी जिल्हातून सर्व गटातून सुमारे २६४ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याने आंतरराष्ट्रीय खेळाडू रियाज अकबर अली विरुद्ध खेळताना पहिला सेट २५-०० असा जिंकून चांगली सुरवात केली होती परंतु रियाज याने आपल्या अनुभवाच्या जोरावर पुढील दोन्ही सेट २५-१५, २५-०४ असे जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या रियाज अकबर अली यान, अभिषेक चव्हाण या जोडीने राहुल भस्मे देवरुख व मुक्तानंद वरवडेकर चिपळूण या जोडीचा ११-०५ व १६-०० असा सरळ दोन सेट मध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. रत्नागिरी कॅरम स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच राजापूरची निधी सप्रे व रत्नागिरीची स्वरा मोहिरे अश्या महिला व किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात दोन्ही सारखेच स्पर्धक होते.
महिला गटाचे विजेतेपद स्वरा मोहिरे तर किशोरी गटाचे विजेतेपद निधी सप्रे हिने मिळवले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला श्री शशिकांत काळे (अध्यक्ष टिळक आळी गणेशोत्सव मंडळ), श्री अरुण करमरकर (विश्वस्त टिळक आळी गणेशोत्सव मंडळ), स्पर्धा प्रमुख श्री मनोहर केळकर, मंदार खेर (विश्वस्त टिळक आळी गणेशोत्सव मंडळ), श्री मिलिंद साप्ते (सचिव, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), श्री नितीन लिमये ( खजिनदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), विनय गांगण ( सदस्य, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), विवेक देसाई ( सदस्य, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), स्पर्धेतील प्रमुख पंच श्री प्रकाश कानिटकर सहाय्यक पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी, सचिन बंदरकर तसेच टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, जिल्हातील कॅरम खेळाडू व कॅरम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.