
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याचं ठिकाण व वेळ ठरली
महाराष्ट्रातील जनतेचा रोष व विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आता शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र विजयी मेळावा घेणार आहेत. मोर्चा रद्द झाल्यानंतर आता ५ जुलै रोजी विजयी मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही भाऊ एकत्र येणार असून मराठी जनतेला संबोधित करणार आहेत. दादरच्या शिवाजी पार्क येथे हा मेळावा घेण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत. मात्र, हे सरकार शिवाजी पार्कवर मेळाव्यास परवानगी देण्याची शक्यता नाही, असं मानून दोन्ही पक्षांनी वरळीच्या एनएससीआय डोमकडे आपला मोर्चा वळवला आहे.
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी शिवसेना-मनसेच्या विजयी मेळाव्याची माहिती दिली. संजय राऊत म्हणाले, “माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही वरळीतील एनएससीआय डोममध्ये हा मेळावा घेण्याचं ठरवलं आहे. शिवसेनेने आधी शिवतीर्थाची निवड केली होती. त्यासाठी आम्ही पालिकेकडे विनंती अर्ज केला आहे. मात्र, हे सरकार आम्हाला शिवतीर्थावर विजयी मेळावा घेऊ देईल असं वाटत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला ज्याला सर्वांनी सहमती दर्शवली आहे.
खासदार राऊत म्हणाले, “विजयी मेळाव्यासंदर्भात आमची एक बैठक झाली आहे. या बैठकीत मेळाव्याचं जे स्वरूप ठरलंय त्याप्रमाणे येत्या ५ जुलै रोजी दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुंबईतील मोठ्या सभागृहात आम्ही हा मेळावा घेत आहोत. या कार्यक्रमाला राज व उद्धव ठाकरे एकत्र असतील. दोन्ही भाऊ एकत्र येतील याबाबत कोणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही.
दरम्यान, राऊत यांनी स्पष्ट केलं की हा केवळ मनसे व शिवसेनेचा (ठाकरे) कार्यक्रम नसेल. मराठीसाठी लढणाऱ्या सर्वांनाच आम्ही या कार्यक्रमाला आमंत्रित करू. ते म्हणाले, मराठीसाठीच्या या लढ्यात सहभागी असलेल्या सर्वांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. मराठी माणसाची एकजूट ही राजकीय पक्षांपलिकडे आहे. आपल्याला दिल्लीला दाखवायचं आहे की दिल्लीने अघोरी कायदा केला, सत्तेच्या आधारे आमच्यावर हल्ले केले. मात्र, महाराष्ट्र पूर्ण ताकदीनिशी त्याविरोधात उभा राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची ताकद दाखवायची आहे. म्हणूनच मी या तिघांना जय महाराष्ट्र केला”.