
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयामध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित कृषी ई- प्रक्षेत्र ग्रंथालयाचा प्रयोग यशस्वी.
क्युआर कोडवर मिळाणार महाविद्यालयामधील सर्व पिके व झाडांची विस्तृत माहिती
आबलोली : खरवते-दहिवली (ता. चिपळूण) शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी ई-प्रक्षेत्र ग्रंथालय हा महाराष्ट्रामधील प्रथमच साकारण्यात आलेला कृषी महाविद्यालयीन नाविन्यपूर्ण व संशोधनात्मक प्रयोग नुकताच यशस्वी करण्यात आला. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांच्या उपस्थितीत या ग्रंथालयाच्या वेब पोर्टलचे उदघाटन उत्साहात पार पडले.बदलत्या काळात कृषी शिक्षणाला एआय तंत्रज्ञानाची जोड देऊन पिके, शोभिवंत झाडे, फुले, फळे व भाजीपाला यांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत मोबाईलद्वारे एका क्लिकमध्ये उपलब्ध करून देणे व त्यांच्या कृषीविषयी ज्ञानात भर टाकण्याच्या उद्देशातून सलग तीन महिन्याच्या अथक परिश्रमातून प्रा. प्रशांत पवार व प्रथम वर्षातील विद्यार्थी यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग साकारण्यात आला. महाविद्यालयामध्ये भेट देणाऱ्या शेतकरी, पर्यटक व कृषी तज्ञ यांना या ग्रंथालयाच्या माध्यमातून झाडांची व पिकांची सहज ओळख होणार आहे. पिकांचे शास्त्रीय नाव, त्यावर प्रादुर्भाव करणारे रोग, कीटक याची माहिती व त्यांचे व्यवस्थापन आदींचा समावेश यामध्ये आहे. महाविद्यालयाच्या आवारातील सर्व झाडांजवळ हे क्युआर कोड लावण्यात आले असून भविष्यात महाविद्यालयाच्या ३५० एकर प्रक्षेत्रावर हा उपक्रम राबविण्याचा प्रा.प्रशांत पवार व विद्यार्थी महेश कोरे, मांतेश कोरे, आदिती पवार, वरद पाटील व अभिजीत झांबरे यांचा मानस आहे.या प्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी प्रा. प्रशांत पवार व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. भविष्यात कृषी क्षेत्राच्या विस्तारीकरणासाठी व येणाऱ्या सर्व संकटांना शास्त्रीयदृष्ट्या तोंड देण्यासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल तसेच शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयामध्ये देखील लवकरच एआय तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत व या विषयातील काही आंतरराष्ट्रीय संस्थांशी संलग्न होऊन, त्यांच्याशी करार करून कोकणातील एकमेव संशोधन केंद्र लवकर उभारू तसेच याबाबत चर्चा देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत झाली आहे, असे मनोगतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेला विस्तारित स्वरूप देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभाग रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता श्री. कोंडा व उपव्यवस्थापक अधिकारी श्री. काजरोळकर हे उपस्थित होते.