
राज्यातील २० लाख ३७ हजार २१० शेतकऱ्यांकडे बॅंकांची ३१ हजार २५४ कोटींची थकबाकी.
राज्यातील २० लाख ३७ हजार २१० शेतकऱ्यांकडे बॅंकांची ३१ हजार २५४ कोटींची थकबाकी असल्याची बाब राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे. त्यात बीड, जालना, बुलढाणा, नांदेड, परभणी व यवतमाळ या जिल्ह्यांतील दीड लाख ते सव्वादोन लाखांपर्यंत शेतकरी सध्या थकबाकीत असल्याचेही त्या अहवालात नमूद आहे.सरकारकडून कर्जमाफीची आशा असल्याने शेतकरी सध्या बॅंकांची थकबाकी भरत नसल्याची स्थिती आहे.राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या वार्षिक नियोजनानुसार खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्जपुरवठा करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सिबिल पाहू नका, असेही आदेश आहेत.
मात्र, बॅंकांमध्ये गेल्यावर शेतकऱ्यांचे सिबिल पाहिलेच जाते अशी वस्तुस्थिती आहे. खरीप सुरू होऊन महिना संपत आला, तरीदेखील बॅंकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्याचीही वस्तुस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, त्यामुळे अनेक शेतकरी त्या आशेवर असून त्यांनी अद्याप बॅंकांची थकबाकी भरलेली नाही. बॅंकांनी अनेकदा नोटिसा बजावून देखील शेतकरी बॅंकांमध्ये फिरकलेले नाहीत.राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांपैकी पूर्वीच्या थकीत कर्जामुळे २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद झाले आहेत.