
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाल्यास ५० लाखांचा उपचारासाठी व मृत्यूसाठी १ कोटी रुपयांचा विमा शासनाने द्यावा; कोकण विकास समितीची मागणी!
कोकण विकास समितीने निवेदन देत मुंबई गोवा महामार्गा वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीची नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक फेरीला एक विशिष्ट रक्कम द्यावी. तसेच अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी किमान ५० लाखांचा व मृत्यू झाल्यास किमान १ कोटी रुपयांचा विमा शासनाने स्वत:च्या खर्चाने करण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम गेले १८ वर्ष सुरु आहे. या मार्गावर पळस्पे – इंदापूर विभाग, चिपळूण – आरवली – संगमेश्वर हातखंबा अशा कित्येक भागातील रास्ता गेल्या अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत आहे. इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण रस्त्यांचे, पळस्पे इंदापूर पट्ट्यातील पूल, लोणेरे पूल, चिपळूण पूल अशा कित्येक ठिकाणी कामच अद्याप सुरु न झाल्यामुळे तासन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. पेण, नागोठणे, सुकेळी येथील रस्त्यांची चाळण झाली आहे. ते टाळण्यासाठी प्रवासी पर्यायी मार्गांचा अवलंब करतात. त्यामुळे काहीही केले तरी वेळेचा आणि इंधनाचा अपव्याय होत आहे. खड्डयामध्ये गाडी आपटून टायर फुटणे, गाडीचे काही महत्वाचे भाग तुटणे, गाडी रस्त्यात बंद पडणे असे प्रकार घडत असल्याने गाडीच्या देखभाल दुरुस्तीचा मोठा खर्च सहन करावा लागतो.
गेल्या काही वर्षांत हजारो नागरिकांना या महामार्गामुळे अपघाती मरण आले आहे. काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. म्हणून ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासारख्या चांगल्या व सुस्थितीत असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडून टोल घेतला जातो, त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मुंबई गोवा मार्गावरून (पळस्पे ते इंदापूर व पुढे इंदापूर ते पत्रादेवी मार्गावरून) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीची नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक फेरीत विशिष्ट रक्कम द्यावी. तसेच, प्रवाशांना अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी किमान ५० लाखांचा व मृत्यू झाल्यास किमान १ कोटी रुपयांचा विमा उपलब्ध करून द्यावा व त्याचा खर्चही शासनाने करावा. अशी मागणी कोकण विकास समितीने निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे.