
रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु
रायगडमधील मुरूड तालुक्यातील कोर्लई किल्ल्याला लागूनच खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे, मात्र ही बोट सुरक्षा यंत्रणांच्या रडारवरुन गायब झाल्याने एकच खळबळ माजली आहे. बोट खोल समुद्रात असण्याची शक्यता असल्याने.सोमवारी सकाळपासून हेलिकॉप्टरद्वारेही या बोटीचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री समुद्रात ही बोट आढळून आली मात्र नंतर ती रडारवरच्या कक्षेच्या बाहेर गेली. समुद्रात आढळलेली ही बोट पाकिस्तानची असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी रविवारी रात्रीच या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं असून रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आल्याची माहिती मिळत आहे.
रविवारी रात्रीच रायगड पोलीस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बाँम्ब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा पोहोचल्या असून सर्व संशयास्पद ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. कोर्लईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नॉटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे मात्र प्रशासनाकडू सध्या तरी अधिकृत माहिती मिळालेली नाही.




