गणितात गोडी निर्माण करणाऱ्या* *विजय बागवे यांचा गौरव* ‘स्पर्धा परीक्षा गणित’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन

चिपळूण, दि. ५ जुलै : “गणित हा विषय विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण करणारा ठरतो. मात्र शिक्षक विजय बागवे सरांनी आपल्या चाळीस वर्षांच्या अनुभवातून ‘स्पर्धा परीक्षा गणित’ हे पुस्तक अतिशय सोप्या आणि विद्यार्थीप्रिय भाषेत लिहिले आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना दिशा देणारे ठरेल. बागवे सर शिक्षक झाले नसते, तर अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचलेले दिसले नसते,” अशा शब्दांत चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर गोविंदराव निकम यांनी बागवे सरांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.श्रीराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण आणि विजय बागवे सरांचे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा गणित’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक ५ जुलै रोजी श्रीराम हायस्कूल, चिपळूण येथे उत्साहात पार पडला. वयाच्या ७६व्या वर्षी लिहिलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण करणारे ठरणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उदय गांधी होते. प्रमुख अतिथी म्हणून चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, साहित्यिक प्रकाश देशपांडे, शिक्षण विस्तार अधिकारी रमाकांत पवार, उपाध्यक्ष कुंदाताई खेडेकर, निवृत्त मुख्याध्यापक श्री. फडके, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष सई वरवटकर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, सेक्रेटरी प्रशांत देवळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लेश लकेश्री, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पंपुटकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजन खेडेकर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. रत्नाकर थत्ते, चिपळूण अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष सतीशअप्पा खेडेकर, युनायटेड हायस्कूलचे निवृत्त शिक्षक मधुसूदन केतकर, तसेच बागवे सरांच्या पत्नी मीनल बागवे आणि त्यांचे सुपुत्र अरविंद, अभिजीत, अनिकेत बागवे यांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त प्राचार्य व श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक विनोद फणसे यांनी केले. त्यांनी सांगितले, “संस्थेचे संचालक असलेल्या बागवे सरांचे पुस्तक प्रकाशित करताना आम्हाला मोठा आनंद होत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी गणिताची भीती दूर करून आत्मविश्वास देणारे हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल.”लेखक विजय गोविंद बागवे सर यांनी आपल्या भाषणात आपल्या शिक्षकी प्रवासाची सखोल झलक दिली.“१९७०च्या दशकात मी न्यू इंग्लिश स्कूल, ओंबळी येथे शिक्षक म्हणून रुजू झालो. त्यानंतर श्रीराम हायस्कूल, चिपळूण येथे डेप्युटेशनवर प्रशिक्षणासाठी गेलो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘सरप्लस’ झालो आणि ती शाळा सोडावी लागली. त्यानंतर मी कसबा हायस्कूल, चिपळूण येथे नोकरी स्वीकारली आणि निवृत्तीपर्यंत तिथेच कार्यरत होतो,” असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्याला समजेल, रुचेल आणि आत्मसात करता येईल अशा पद्धतीने शिकवणे हे माझे शैक्षणिक तत्त्व होते. गणितासारखा विषय शिक्षकाच्या शिकवण्यावर प्रेम करण्यास प्रवृत्त करतो, हे मी अनुभवले. माझे प्रमुख नेहमी विज्ञान-गणित प्रशिक्षणासाठी माझी शिफारस करत असत. यामुळे माझ्या क्षमतांना चालना मिळाली. नंतर श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कमिटीत काम करण्याची संधी मिळाली.”शिष्यवृत्ती मार्गदर्शनाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, “पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिलो. चिपळूणमध्ये स्थायिक झाल्यानंतर मी या कार्यासाठी अधिक वेळ देऊ शकलो. आजपर्यंत माझ्या मार्गदर्शनातून १८९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले, ही माझ्यासाठी मोठी समाधानाची गोष्ट आहे.”पुस्तकाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावणारे सुरेश काजरे (मांडणी व डीटीपी), तसेच प्रकाशक आदर्श विद्यार्थी प्रकाशन, पुणे, आणि योगेश कुंदुर व आपले कुटुंबीय यांचे त्यांनी विशेष आभार मानले.कार्यक्रमात बागवे सरांचे विद्यार्थी ऋषिकेश लेले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “सरांनी आम्हाला शिष्यवृत्ती मिळवण्यापुरतेच शिकवले नाही, तर आनंदाने शिकणे काय असते हे शिकवले. पैसे नाही, तर आत्मिक समाधान शोधणारा शिक्षक म्हणजे बागवे सर.”शिष्यवृत्तीधारक आराध्य सकपाळचे वडील अरविंद सकपाळ यांनी नमूद केले की, “मुलाच्या आयुष्यात सकारात्मक बदल बागवे सरांच्या वर्गात घडला. त्यांच्या शिकवण्यामुळे आत्मविश्वास वाढला.”शिक्षक आनंद भुवड यांनी नवोदित शिक्षकांनी बागवे सरांसारख्या आदर्शांचा पाठपुरावा करावा, असे आवाहन केले.निवृत्त शिक्षक मधुसूदन केतकर यांनी सांगितले की, “बागवे सर हे ग. ना. दातार महाविद्यालयाचे पहिले विद्यार्थी आहेत. त्यांची शैक्षणिक वाटचाल आणि साधेपणा अनुकरणीय आहे.”शिक्षण विस्तार अधिकारी रमाकांत पवार यांनी शिक्षकांनी सेवेत असतानाच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावा आणि बागवे सरांचा आदर्श घेऊन काम करावे, असे मत मांडले.साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “आज चांगले शिक्षक मिळणे दुर्मीळ झाले आहे. मात्र गणित हा नावडता विषय बागवे सरांनी आवडता केला. ते पदावर नसतानाही समाजासाठी काम करणारे आहेत. आज इतके लोक एका शिक्षकाच्या प्रेमामुळे येथे उपस्थित आहेत, हे त्यांच्या कार्याचे मोल अधोरेखित करणारे आहे.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मानसी अमोल टाकळे यांनी ओघवत्या आणि प्रासादिक शैलीत केले.अनिकेत बागवे यांनी सर्व मान्यवरांचे, कुटुंबियांचे, मित्रपरिवाराचे आणि उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button