
ठाकरे गटाचे अनंत नर यांची आमदारकी कायम; उच्च न्यायालयाचा निर्णय, अपक्ष उमेदवाराला साडे तीन लाखांचा दंड
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाततून निवडून आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) नेते अनंत बी. नर यांच्या आमदारकीला आव्हान देणारी अपक्ष उमेदवाराची याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली.चुकीच्या पद्धतीने याचिका केल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्याला साडेतीन लाख रुपये दंड म्हणून न्यायालयात जमा करण्याचे आदेशही दिले.
नर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी निवडणूक याचिका अपक्ष उमेदवार रोहन साटोणे यांनी केली होती. या याचिकेवर नुकतीच न्या. अभय अहुजा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, चुकीच्या पद्धतीने याचिका केल्याचे निरीक्षण नोंदवून नर यांनी वकिलांवर केलेल्या खर्चाची त्यांना परतफेड करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, याचिकाकर्त्याला साडेतीन लाख रुपये दोन आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.